कधीकधी एखादा विशिष्ट खेळाडू एखाद्या संघात सामील होतो तेव्हा त्या संघाचे भाग्य बदलते. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये यंदा व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात असाच एक योगायोग पाहायला मिळाला. चालू हंगामात भारतात खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या (IPL) पहिल्या आवृत्तीत केकेआर संघ सात सामन्यांमध्ये दोन विजय आणि पाच पराभवांसह सातव्या स्थानावर होता आणि प्लेऑफमध्ये पोहोचणे खूप कठीण दिसत होते, पण अय्यरला संधी मिळताच संघाचे भाग्य बदलले. आयपीएल 2020 च्या लिलावात 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसाठी केकेआरने खरेदी केलेल्या अय्यरला आयपीएल 2021 च्या यूएई आवृत्तीच्या सुरुवातीला पदार्पणाची संधी मिळाली. केकेआरने (KKR) पहिल्या लेगच्या सात सामन्यांमध्ये अय्यरला एकही सामन्यात खेळवले नव्हते. त्यानंतर जेव्हा युएईमध्ये दुसरा लेग सुरू झाला, तेव्हा केकेआरने प्रत्येक सामन्यात 20 लाख रुपयांत विकत घेतलेल्या अय्यरला सलामीला उतरवले. (IPL 2021: एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 सामना जिंकून फायनल गाठणारा KKR तिसरा संघ, दोन माजी चॅम्पियन टीम यादीत सामील)
यायचा परिणाम असा झाला की व्यंकटेशने फक्त चमकदार कामगिरीच नाही केली तर केकेआरचे नशीबही बदलले आणि त्यांनी सात पैकी पाच सामने जिंकून यूएईच्या टप्प्यात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. इतकंच नाही तर कोलकाताने आयपीएल 2021 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अय्यरने आतापर्यंत यंदाच्या आयपीएलमध्ये 9 सामन्यात 320 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 125.00 च्या सरासरीने फलंदाजी करत तीन अर्धशतक ठोकले आहेत. चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर कोलकाता कदाचित आयपीएल 2021 च्या प्लेऑफमध्ये पात्र ठरला असेल, परंतु त्यानंतर संघाने हे दाखवले की संघ त्यास पात्र होता. एलिमिनेटर सामन्यातही केकेआरने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला अटीतटीच्या सामन्यात पराभूत केले आणि आता शारजाह येथे बुधवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा तीन गडी राखून पराभव केला. यूएई आवृत्तीतील केकेआरचा नऊ सामन्यांमधील हा सातवा विजय होता. आता केकेआर अंतिम फेरीत 15 ऑक्टोबर रोजी चेन्नई सुपर किंग्जचा सामना करेल.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएलच्या क्वालिफायर-2 मध्ये व्यंकटेश अय्यरने 41 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. तथापि, शेवटच्या क्षणी सामना दिल्लीच्या वाटेने जाताना दिसत होता, पण राहुल त्रिपाठीने शेवटच्या डावाच्या अंतिम षटकाच्या पाचव्या चेंडूवर षटकार खेचून केकेआरला अंतिम फेरीत पोहचवले.