IPL 2021: एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 सामना जिंकून फायनल गाठणारा KKR तिसरा संघ, दोन माजी चॅम्पियन टीम यादीत सामील
कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

इयन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) इंडियन प्रीमियर लीग  (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात फेरबदलचा चांगला आनंद लूटत आहे. भारतात आयोजित पहिल्या टप्प्यात केकेआर (KKR) सातपैकी फक्त दोन सामने जिंकला होता. तर युएई येथे त्यांचं नशीब संपूर्णपणे बदललं आणि संघाने नऊपैकी सात सामने जिंकून जोरदार खेळीच्या बळावर फायनलपर्यंतचा प्रवास केला. केकेआरने यंदाच्या आयपीएल गुणतालिकेत 14 पॉईंटसह चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफ गाठले होते. एलिमिनेटर (Eliminator) सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर एकतर्फी विजय मिळवला. तर दुसऱ्या क्वालिफायर (Qualifier-2) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला लोळवलं. यासह केकेआर तिसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरली. याशिवाय त्यांच्या नावे आता एका अनोख्या कामगिरीची देखील नोंद झाली. एलिमिनेटर आणि क्वालिफायर जिंकून केकेआर आयपीएलच्या अंतिम (IPL Final) फेरीत पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. (IPL 2021 Qualifer-2, KKR vs DC: दिल्लीवर भारी नाईट रायडर्स; रोमांचक सामन्यात पराभवानंतर खेळाडूंना अश्रू अनावर! पहा इमोशनल Video)

केकेआरने सोमवारी एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) पराभव केला. आणि विराट कोहलीच्या त्याच्या दीर्घकालीन फ्रँचायझीसह आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. त्यानंतर नाईट रायडर्सने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 3 गडी राखून पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. चेन्नई सुपर किंग्जने 2013 आणि सनरायझर्स हैदराबादने 2018 मध्ये एलिमिनेटर आणि क्वालिफायर-2 जिंकून फायनलमध्ये एन्ट्री घेतली होती. उल्लेखनीय म्हणजे एकूण 10 विजयात 20 गुणांसह साखळी फेरीत अव्वल राहिलेले दिल्ली कॅपिटल्स 150 पेक्षा कमी धावांचा बचाव करताना एकही सामना जिंकण्यात अपयशी ठरले आहे. ऑस्ट्रेलियन महान रिकी पाँटिंगने त्यांच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, दिल्ली कॅपिटल्सची ताकद वाढली आहे. त्यांनी गेल्या वर्षी उपविजेते ठरले होते. यंदा त्यांचे ध्येय एक चांगला खेळ करण्याचे होते आणि दुसऱ्या लेगला जोरदारपणे सुरुवात केली होती, परंतु त्यांनी स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात लय गमावली.

विशेष म्हणजे, केकेआरबद्दल बोलायचे तर दोन वेळा चॅम्पियन संघाला आयपीएल फायनल मध्ये एकदाही पराभव पत्करावा लागलेला नाही. 2012 मध्ये त्यांनी एमएस धोनीच्या सीएसकेचा पाच गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर 2014 मध्ये केकेआरने किंग्ज इलेव्हन पंजाबचा (आता पंजाब किंग्स) तीन गडी राखून पराभव करून जेतेपद पटकावले होते.