IPL 2021: डेविड वॉर्नरने SRH ची केली पोलखोल, कोणतेही कारण न देता केली कर्णधार पदावरून हकालपट्टी
डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) माजी कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) एक धक्कादायक खुलासा केला की कर्णधारपदावरून त्याला का काढून टाकण्यात आले हे त्याच्या आयपीएल मालक किंवा संघ व्यवस्थापनाने सांगितले नाही. एप्रिलमध्ये इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या पहिल्या आवृत्तीत ऑस्ट्रेलियन सलामीवीर वॉर्नरच्या जागी केन विल्यमसनकडे (Kane Williamson) कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली होती. उल्लेखनीय म्हणजे त्यावेळी संघ 6 पैकी 5 सामन्यात पराभूत झाल्यानंतर गुणतालिकेच्या तळाशी बसलेला होता. वॉर्नरने स्पोर्ट्स टुडेला सांगितले, “मालक आणि आमचे कोचिंग स्टाफ, ट्रेवर बेलीस, लक्ष्मण, मूडी आणि मुरली यांच्याबद्दल मला खूप आदर आहे, पण जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा तो एकमताने व्हायला हवा. तुमच्या समर्थनात कोण आहे आणि कोण नाही हे तुम्हाला माहीत नाही.” (David Warner चा सनरायझर्स हैदराबादला रामराम? भावनिक संदेश पोस्ट करून दिले संकेत)

वॉर्नर म्हणाला, “माझ्यासाठी निराशाजनक गोष्ट म्हणजे मला कर्णधार म्हणून काढून टाकण्याचे कारण दिले गेले नाही. जर तुम्हाला फॉर्ममुळे निर्णय घ्यायचा असेल तर ते अवघड आहे, कारण मला वाटते की तुम्ही आधी केलेल्या कामगिरीचे नंतर काही परिणामही मिळाले पाहिजेत.” वॉर्नर पुढे म्हणाला की, त्याला पुन्हा SRH चे प्रतिनिधित्व करायला आवडेल, पण ते त्याच्या हातात नाही. वॉर्नर म्हणाला, “सनरायझर्सचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा मी काहीही पसंत करणार नाही, पण साहजिकच निर्णय मालकांचा आहे.” दरम्यान, सनरायझर्स हैदराबादसाठी आयपीएल 2021 अत्यंत निराशाजनक ठरले. संघ फक्त 6 गुण मिळवू शकला आणि गुणतालिकेत तळाशी राहिला. भारत असो किंवा युएई, संघाचे भाग्य कुठेही बदलू शकले नाही. पहिल्या सामन्यापासून संघाची खराब कामगिरी सुरूच राहिली. नशीब बदलण्यासाठी कर्णधारही बदलला, पण तेही कामी आले नाही.

ऑस्ट्रेलियन दिग्गज वॉर्नर, जो गेल्या अनेक मोसमांपासून संघाचे कर्णधारपद सांभाळत होता, त्याला मध्यभागी कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि नंतर संघातूनही वगळण्यात आले. भारतात खेळलेल्या यंदाच्या हंगामाच्या पहिल्या भागात वॉर्नरला संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यावेळी संघासह स्वतः वॉर्नर फारशी चांगली कामगिरी करू शकला नव्हता. अशा परिस्थितीत हैदराबादला 2016 मध्ये चॅम्पियन बनवणाऱ्या वॉर्नरची जागा न्यूझीलंडचा दिग्गज कर्णधार केन विल्यमसनने घेतली, पण यामुळेही संघाचे भाग्य बदलले नाही आणि हैदराबादला संपूर्ण हंगामात फक्त 3 विजय मिळवता आला.