रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी  (Kolkata Knight Riders) होईल. आरसीबी (RCB) संघाची कामगिरी संपूर्ण हंगामात आश्चर्यकारक राहिली असताना, केकेआर (KKR) यूएई आवृत्तीत प्रभावी ठरली. इयन मॉर्गनच्या नेतृत्वात कोलकात्याने 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवत प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले. शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केल्यानंतर बेंगलोरचा उत्साहही उंचावलेला दिसत आहे. अशा स्थितीत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोणता संघ पाऊल टाकेल हे सांगणे फार कठीण आहे. या कठीण प्रश्नाचे उत्तर भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी दिले आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश म्हणाले की त्यांच्या मते कोलकाता नाईट रायडर्स संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर मात करू शकतो आणि दिल्ली कॅपिटल्ससोबत दुसरा क्वालिफायर खेळेल. (IPL 2021: विराट कोहलीच्या RCB चे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयामागे आहेत दोन मोठी कारणे, वाचा सविस्तर)

माजी भारतीय क्रिकेटपटूने असेही भाकीत केले की जो संघ हा सामना जिंकू शकेल तो आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना करेल. म्हणजेच आकाशच्या मते, दिल्लीला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागू शकते. आकाशने सांगितले की, “एलिमिनेटर सामन्यात विराट कोहली आणि इयन मॉर्गन फलंदाजीने काही विशेष दाखवू शकणार नाहीत. त्यांच्या मते या सामन्यात हर्षल पटेल आणि वरुण चक्रवर्ती पुन्हा एकदा चेंडूने चमत्कार करतील आणि त्यांच्या नावावर किमान 4 विकेट होतील.” केकेआर आणि आरसीबीच्या संघांनी या हंगामात यापूर्वी दोनदा आमनेसामने आले होते ज्यात ‘विराटसेने’ने एकदा विजय मिळवला आहे आणि मॉर्गनच्या नाईट रायडर्सने दुसऱ्या सामन्यात मैदान मारलं. पहिल्या लेगमध्ये आरसीबीने केकेआरचा 6 धावांनी पराभव केला, तर यूएईच्या आवृत्तीत कोलकाता 9 विकेट्सने सामना जिंकला. आरसीबीच्या फलंदाजांनी केकेआर गोलंदाजांपुढे सहज हार पत्करली आणि अवघ्या 92 धावांवर संपूर्ण टीम ढेर झाली.

शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आरसीबी आणि केकेआर यांच्यातील सामना रंगणार आहे. मॉर्गनच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या यूएई लेगमध्ये आश्चर्यकारक खेळी करून 14 गुणांसह प्लेऑफ फेरी गाठली. आयपीएल 2021 चा पूर्वार्ध केकेआरसाठी नाजूक होता आणि त्यांनी 7 पैकी फक्त 2 सामने जिंकले.