भारताचा युवा फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) खऱ्या अर्थाने फॉर्ममध्ये परतला आहे. गतविजेत्यांना त्याची सर्वात जास्त गरज होती तेव्हा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) स्टारने शुक्रवारी आयपीएल (IPL) 2021 चे सर्वात जलद अर्धशतक ठोकले. किशनने अबू धाबीमध्ये (Abu Dhabi) मोसमाच्या 55 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध दणदणीत फलंदाजी करून गोलंदाजांची क्लास घेतली. किशनने पॉवरप्लेमध्ये 2 षटकार आणि 10 चौकार खेचले व मुंबई इंडियन्सला पहिल्या 6 षटकांत 83 धावांपर्यंत मजल मारून दिली. 16 चेंडूत अर्धशतक इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासातील आतापर्यंतचे तिसरे सर्वात जलद आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स खेळाडूने हे सर्वात वेगवान आहे. तसेच किशनने पॉवरप्लेमध्ये फक्त 22 चेंडूंमध्ये 63 धावा ठोकल्या, जी आयपीएल इतिहासातील पॉवरप्लेमध्ये चौथी सर्वाधिक धावसंख्या ठरली. दरम्यान आपल्या या रेकॉर्ड-ब्रेक खेळीसह ईशानने अनेक विक्रम मोडित काढले. (IPL 2021, SRH vs MI: ईशान किशन-सूर्यकुमार यादवने केली गोलंदाजांची धुलाई, मुंबईने उभारला धावांचा डोंगर; हैदराबादना हव्यात 236 धावा)
1. किशनने एकाच डावात अनेक विक्रम आपल्या नावे केले. त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम केला.
2. तसेच यूएईमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज बनला. यापूर्वी गेल्या मोसमात निकोलस पूरनने सनरायझर्स हैदराबादविरुद्धचं 17 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला होता. यासह, तो आता आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक करणारा संयुक्त तिसरा फलंदाज बनला आहे.
3. आयपीएल इतिहासात आतापर्यंत सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलच्या नावावर आहे. 2018 मध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध फक्त 14 चेंडूत ही कामगिरी केली होती. 2014 मध्ये युसूफ पठाणने हैदराबादविरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक केले होते. यासह, ईशानने सुरेश रैनासह यादीत संयुक्त तिसरे स्थान पटकावले आहे.
दरम्यान ईशानने आपल्या डावात फक्त 32 चेंडू खेळले आणि 11 चौकार व 4 षटकारांसह 84 धावा ठोकल्या. या डावादरम्यान ईशानचा स्ट्राईक रेट 262.5 होता. ईशान युएई येथे आयपीएलच्या सुरुवातीला खराब फॉर्मशी झुंज देत होता, त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मधून बाहेर बसावे लागले होते. पण शेवटच्या सामन्यात त्याने शानदार पुनरागमन केले. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यात किशनने अवघ्या 25 चेंडूत 50 धावा ठोकल्या.