IPL 2021: आयपीएल 14 च्या लीग स्टेज मॅच मुंबईत, तर प्ले ऑफचे सामने मोटेरा स्टेडियममध्ये? DC सह-मालक पार्थ जिंदल यांनी 'हा' दिला इशारा
मुंबई इंडियन्स आयपीएल 2020 (Photo Credit: PTI)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी 14व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव संपुष्टात आला आहे आणि आता यंदा आयपीएल (IPL) कुठे खेळला जाईल याबाबत अद्याप निर्णय शिल्लक आहे. दरम्यान, असं समजलं जात आहे की यंदा आयपीएल भारतात खेळला जाऊ शकतो आणि त्याच्या लीग फेरीतील सामने मुंबईत (Mumbai) आणि अहमदाबाद (Ahmedabad) येथे प्ले-ऑफ सामने खेळले जातील. ESPNCricinfo च्या अहवालानुसार दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) सहमालक पार्थ जिंदल (Parth Jindl) यांनी गुरुवारी लिलावात याबाबत काही मोठे संकेत दिले. कोरोना काळात यंदा मोजक्याच ठिकाणी आयपीएल सामने आयोजन करण्याबाबत बीसीसीआय (BCCI) विचारात आहे. पार्थ जिंदल म्हणाले, “मी जे पहात आणि ऐकत आहे त्यानुसार जर इंग्लंड भारत दौर्‍यावर येऊ शकतो, जर आयएसएलचे सर्व सामने गोव्यामध्ये आयोजित केले जाऊ शकतात तर विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉपिझ्या सर्व शहरांमध्ये असल्यास आयपीएल परदेशात खेळवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला वाटत की आयपीएल यंदा भारतातच होईल.” (IPL 2021 Auction: आयपीएलसाठी 8 संघानी खेळाडूंवर केली पैशाची बरसात, पहा MI, CSK, PBKS सह सर्व संघाची संपूर्ण यादी)

जिंदल यांनी पुढे म्हणाले की, “लीग स्टेज एका मैदानावर होईल आणि प्लेऑफ दुसऱ्या ठिकाणी होईल असे दिसत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार मुंबईमध्ये लीग स्टेज सामने होऊ शकतात, कारण तिकडे तीन स्टेडियम्स आहेत, तसंच सरावासाठी गरजेच्या असलेल्या सुविधाही आहेत. यानंतर, अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर प्लेऑफ सामान्यांचं आयोजन होऊ शकतं.” मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि नवी मुंबईतील डी.वाय.पाटील असे तीन स्टेडियम उपलब्ध आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक जिंदल म्हणाले की, सर्व लीग सामने मुंबईत झाल्यास संघाला फायदाच आहे. दिल्ली संघात श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे असे मुंबईचे खेळाडू आहेत. शिवाय, स्टीव्ह स्मिथची फलंदाजी मुंबईच्या विकेटवर कमालीची ठरू शकते, असेही जिंदाल म्हणाले.

स्मिथचा संघात समावेश केल्याबद्दल जिंदल म्हणाले की, “स्टीव्ह स्मिथ मिळवणे इतके आश्चर्यकारक होते. तो केवळ 2.2 कोटीमध्ये कसा गेला याबद्दल आम्हाला धक्का बसला आहे, परंतु स्मिथच्या कॅलिबरचा खेळाडू मिळविण्यासाठी, आमच्या संघात बरेच काही वाढणार आहे. त्याचे नेतृत्व, त्याची फलंदाजी, त्याचा अनुभव, सर्वकाही,” ANI ने दिलेल्या माहितीनुसार पार्थ जिंदल म्हणाले.