IPL 2021 Auction: 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) 18 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या लिलावाच्या रिंगणात उतरला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनची बेस किंमत (Arjun Tendulkar Base Price) 20 लाख रुपये असून नुकताच त्याने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये मुंबईकडून (Mumbai) पदार्पण केलं आणि तो काही काळापासून मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाबरोबर प्रशिक्षण घेत असून 2020 मध्ये तो टीमसोबत युएई येथेही गेला होता. तथापि, तो अद्याप संघात नव्हता कारण त्याने त्यावेळी आपल्या राज्य संघासाठी प्रथम श्रेणी किंवा लिस्ट ए पदार्पण केले नव्हते ज्यामुळे लिलावात भाग घेण्यास अपात्र होता. 21 वर्षीय अर्जुन अष्टपैलू खेळाडू असून तो डावखुरा जलदगती गोलंदाज आणि फलंदाज आहे. यापूर्वी, तो इंग्ल्डंमध्ये क्लब क्रिकेट खेळला आहे. (IPL 2021 Auction: आयपीएल लिलावात 1097 खेळाडूंवर लागणार बोली; वेस्ट इंडिजचे सर्वाधिक 56 खेळाडू तर जो रूट, मिचेल स्टार्कची माघार)
घरेलू क्रिकेटमधून अर्जुनच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर अंडर-19 युवा कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि नुकतंच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतून मुंबईकडून पदार्पण केले होते. तथापि, त्याच्यासाठी स्पर्धा चांगली ठरली नाही आणि त्याने सात ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत 67 धावा दिल्या. आता 21 वर्षीय खेळाडूने आयपीएलच्या लिलावात प्रवेश केल्याने कोणती फ्रेंचायझी त्याच्यासाठी बोली लागावते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. आयपीएल 2021 खेळाडूंच्या लिलावासाठी तब्बल 1097 खेळाडूंनी नोंदणी केली आहे ज्यातील 814 भारतीय तर 283 विदेशी खेळाडू आहेत. आयपीएलच्या लिलावात स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, आरोन फिंच आणि क्रिस मॉरिस यांच्या सारखे खेळाडूही यंदा लिलाव प्रक्रियेत भाग घेणार असतील. आयपीएल लिलावातून यंदा बऱ्याच मोठ्या नावांनी माघार घेतली आहे त्यापैकी मिचेल स्टार्क एक आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज 2016 पासून आयपीएल खेळलेला नाही.
भारतीयांपैकी केदार जाधव, हरभजन सिंह आणि एस श्रीसंत यांनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. 2013 मध्ये पहिल्यांदा आयपीएल खेळलेल्या श्रीसंतची बेस प्राइस 75 लाख रुपये आहे, तर जाधव आणि हरभजनची बेस प्राइस 2 कोटी रुपये आहे. हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा यांनीही लिलावासाठी नोंदणी केली आहे.