IPL 2021 Auction: ‘CSKने एमएस धोनीला रिटेन करू नये, 15 कोटींचे होईल नुकसान’, फ्रँचायझीला आकाश चोपडा यांचा सल्ला
एमएस धोनी, सीएसके कर्णधार (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सर्वात यशस्वी संघांपैकी एक चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि त्यांचा कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) युएई येथे यंदा आयोजित केलेल्या आयपीएलच्या 13व्या सत्रात उठावदार कामगिरी करता अली नाही. सीएसकेच्या (CSK) काही खेळाडूंना वगळता धोनी यंदा आपल्याला साजेसा खेळ करता आला नाही, ज्यामुळे त्याच्यावर अनेक टीका करण्यात आल्या. आणि 2021 मध्ये आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) झाल्यास सीएसकेने धोनीला रिटेन करू नये असा सल्ला भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध हिंदी भाष्यकार आकाश चोपडा (Aakash Chopra) यांनी दिला. चोपडा यांनी यामागचे कारणही सांगितले आहे. त्यांच्या मते जर संघाने धोनीला कायम ठेवले तर संघाचे 15 कोटी रुपयांचे नुकसान होईल म्हणून त्यांना धोनीला रिटेन न करता जेव्हा त्याला एखादा संघ खरेदी करेल तेव्हा त्याला राईट टू मॅच कार्डचा वापर करून पुन्हा संघात सामील करावे. (IPL 2020 Eliminator मधील पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात करणार बदल, फ्रँचायझीला आयपीएल 2021 लिलावाची प्रतीक्षा)

चोपडा यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले की, “मला वाटते की एखादा मेगा लिलाव असेल तर सीएसकेने धोनीला सोडले पाहिजे. मी धोनीला संघात न घेण्याचे सांगत नाही, तो पुढचा आयपीएल खेळेल आणि जर तुम्ही त्याला टिकवून ठेवले तर तुम्हाला 15 कोटी द्यावे लागतील. जर धोनी थांबला आणि तो फक्त 2021 आयपीएल खेळला तर 2022 च्या हंगामात तुम्हाला 15 कोटी परत मिळतील, पण मग तुम्ही त्या पैशाचे काय कराल? मेगा लिलावाचा हा फायदा आहे, राईट टू मॅच कार्डच्या माध्यमातून सीएसके त्याला पुन्हा संघात सामील करू शकतात.” आयपीएल 2020 मध्ये सीएसकेची निराशाजनक राहिली. संघ पहिल्यांदा प्ले ऑफमध्ये प्रवेश करू शकला नाही.

“तुम्ही धोनीला लिलावातही घेऊ शकता. जर चेन्नईच्या फायद्यासाठी पाहायचं झालं, तर धोनीला रिलीझ करून लिलावात घेणे सर्वात जास्त फायद्याचे ठरेल,” चोपडा पुढे म्हणाले. आयपीएल 2020मध्ये चेन्नईने 14 सामने खेळले त्यापैकी त्यांना केवळ 6 सामन्यात विजय मिळवता आला, तर उर्वरित 8 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामात ते 12 गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर होते. आयपीएलमध्ये सध्याच्या आठही फ्रँचायझींपैकी सीएसके संघाला पुढील वर्षाच्या आयपीएलपूर्वी मेगा लिलावाची गरज असल्याचेही चोपडा यांनी म्हटले. यावर्षी खेळलेल्या खेळाडूंना सीएसके कायम ठेवतील की नाही हे सध्या माहित नाही.