हरभजन सिंह (Photo Credit: Instagram/iplt20)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्रातून सुरेश रैनाने माघार घेतल्यावर तीन वेळा आयपीएल विजेता चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) दुसरा मोठा झटका बसला आहे. NDTVच्या रिपोर्टनुसार अनुभवी भारतीय गोलंदाज हरभजन सिंहने (Harbhajan Singh) "वैयक्तिक कारणास्तव" स्पर्धेतून माघार घेतली आहे. यंदाच्या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय त्याने गुरुवारी व्यवस्थापनाला दिला असल्याचे समजले जात आहे. यापूर्वी अनुभवी ऑफस्पिनर 1 सप्टेंबर रोजी संघात सामील होणे अपेक्षित होते. यंदाच्या आयपीएलमधून (IPL) वैयक्तिक कारणे दाखवून आपले नाव मागे घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सीएसके (CSK) कॅम्पमधील दुसरा क्रिकेटपटू ठरला. टीमबरोबर युएईसाठी प्रवास केल्यावर रैना मायदेशी परतला होता, तर काही वैयक्तिक कारणास्तव हरभजन भारतातच होता. दरम्यान, शुक्रवारी संघ मालकांकडून औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. (IPL 2020 Update: चेन्नई सुपर किंग्सच्या सर्व खेळाडूंची दुसरी COVID-19 टेस्ट रिपोर्ट आला समोर, वाचा सविस्तर)

यापूर्वी सीएसके कॅम्पमधील दोन गोलंदाजांसह 13 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचा अनुभवी फलंदाज रैनाने एकाएकी माघार घेतली ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले. त्यानंतर रैनाच्या माघार घेण्यामागे एमएस धोनी आणि त्याच्यातील वाद कारणीभूत असल्याचे सुपर किंग्सचे मालक एन श्रीनिवासन यांनी सांगितलं. नंतर त्यांनीच त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. शिवाय, गतविजेता मुंबई इंडियन्सचा मॅच-विनर गोलंदाज लसिथ मलिंगा देखील स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मलिंगाने वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाला सांगितले. मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटीन्सनचा संघात बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुंबईचा मलिंगा आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज आहे. त्याने आजवर 122 सामन्यांमध्ये 170 विकेट्स घेतल्या आहेत.

दुसरीकडे, चेन्नई टीमच्या खेळाडूंची दुसऱ्यांदा कोरोना टेस्ट करवण्यात आली ज्याचा अहवाल नकारात्मक आल्यावर आता, शुक्रवार किंवा शनिवार पासून ते सरावाला सुरुवात करू शकतात. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कासी विश्वनाथन यांनी इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “नकारात्मक टेस्ट आल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे. प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्या निर्णयानुसार आम्ही शुक्रवारी दुपारी किंवा शनिवारी सकाळी सराव सुरू करू.”