इंडियन प्रीमिअर लीगचे (Indian Premier League) 13 वे सत्र सुरु होण्यापासून अवघे काही दिवस शिल्लक आहेत. खेळाडू आणि फ्रँचायझीसह चाहते देखील वेळापत्रकाची उत्सुक आहेत. स्वत: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आयपीएलचे वेळापत्रक कधी घोषित होईल, याची माहिती दिली आहे. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाले की, “आम्हाला समजते की वेळापत्रकांमध्ये उशीर होत आहे आणि 4 सप्टेंबर रोजी म्हणजे आज वेळापत्रक घोषित करण्यात येईल.” 19 सप्टेंबर रोजी आयपीएलची सुरुवात होईल. सुरुवातीचा सामना गेतजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) दरम्यान खेळला जाईल अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. यापूर्वी मार्च महिन्यात होणाऱ्या आयपीएलमध्ये पहिला सामना या दोन चॅम्पियन टीममध्ये होणे निश्चित होता. पण, काही दिवसांपुर्वी सीएसकेचे (CSK) 13 सदस्य कोरोना पॉसिटीव्ह आढळल्यानंतर आयपीएलचा पहिला सामना कोणत्या दोन संघात होईल यावर संभ्रम बनले होते. (IPL 2020: मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी आणि लसिथ मलिंगा यांच्यामध्ये आहे विशेष संबंध, रोहित शर्माची टीम पुन्हा बनणार चॅम्पियन? वाचा सविस्तर)
यंदा कोरोना व्हायरसमुळे 28 मार्च रोजी सुरु होणाऱ्या आयपीएल 2020चे आयोजन पुढे ढकलण्यात आले. बुधवारी बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमल यांनी आयएएनएसला सांगितले होते की, लीग नियोजित वेळापत्रकानुसार सुरु होईल. गेल्या महिन्यात सुपर किंग्जचे 13 सदस्य कोरोना पॉसिटीव्ह आढळल्यावर 13व्या आवृत्तीबद्दल शंका निर्माण झाली होती आणि त्यामुळे युएईमधील कोरोना व्हायरसच्या परिस्थितीनुसार वेळेत स्पर्धा सुरू होईल की नाही यावर अंदाज वर्तविला जात होता. मात्र, यूएईमध्ये आता सर्व काही ठीक आहे आणि नियोजित प्रमाणे स्पर्धा होईल असे धुमल यांनी स्पष्ट केले.
56 दिवस होणाऱ्या स्पर्धेचे सामने अबू धाबी, दुबई आणि शारजाह अशा तीन ठिकाणी खेळले जातील. आयपीएलचे ग्रुप स्टेजमधील एकूण 35 सामने खेळण्यात येऊ शकतात. दुसरीकडे, दोन आठवडे शिल्लक असताना खेळाडूंचे माघार घेण्याचे सत्र सुरु आहे. सुपर किंग्जचा फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा केन रिचर्डसन आणि मुंबई इंडियन्सच्या दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा यांनी आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मलिंगा आणि रिचर्डसन वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे.