IPL 2020 Schedule Update: आयपीएल फॅन्ससाठी गुड न्यूज! 19 सप्टेंबरपासून UAE येथे होणार आयोजन, 8 नोव्हेंबर रोजी फायनल
रोहित शर्मा-एमएस धोनी (Photo Credit: Getty)

यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये (UAE खेळला जाईल, तर अंतिम सामना 8 नोव्हेंबर रोजी होईल. बीसीसीआयशी (BCCI) संबंधित सूत्रांनी गुरुवारी वृत्तसंस्था PTIला ही माहिती दिली. पुढील आठवड्यात होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत (IPL Governing Council Meeting) त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकेल. बीसीसीआयने फ्रँचायझींना या योजनेची माहिती दिली आहे. बीसीसीआय अधिकाऱ्याने एजन्सीला सांगितले की यावेळी लीग 51 दिवसात संपेल ज्याचा फायदा फ्रेंचायझी, प्रसारक आणि इतर भागधारकांना होईल. या वेळी आयपीएल (IPL) 26 सप्टेंबरपासून सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, परंतु बीसीसीआयने या वर्षा अखेरीस होणारा ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात ठेवत एक आठवडा आधी याची तयारी सुरू केली आहे. युएई येथे लीग आयोजित केली जाईल आणि कोरोनामुळे सर्व संघ एक महिना अगोदर तेथे दाखल होतील जेणेकरून तेथील हवामान आणि वातावरणानुसार खेळाडू स्वत:ला जुळवून घेऊ शकतील. (IPL 2020: आयपीएल यंदा होऊ नये यासाठी माजी ICC अध्यक्ष शशांक मनोहर करत होते प्रयत्न, माजी पाकिस्तानी क्रिकेटर बसित अलीचा धक्कादायक दावा)

मिळालेल्या माहितीनुसार सर्व फ्रॅन्चायझी 20 ऑगस्टला तिथे पोहोचण्याची तयारी करत आहेत. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक पुढच्या आठवड्यात होईल ज्यात तीन मोठ्या अजेंडावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामध्ये युएईमध्ये लीग हलविणे, फ्रेंचायझींसाठी कोरोना मार्गदर्शकतत्त्वे तयार करणे आणि ब्रॉडकास्टर मागणी समाविष्ट आहे. एका फ्रँचायझीशी संबंधित अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की युएईमध्ये लीग आयोजित करण्यास सरकार कडून मंजुरी मिळताच बीसीसीआय अमीरात क्रिकेट बोर्डाला याची माहिती देईल. बैठकीत हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 8 वाजता (6.30 वाजता दुबईच्या वेळेनुसार) किंवा अर्ध्या तासाच्या आधी सुरु करण्यावरही निर्णय घेतला जाईल.

“आयपीएलची 19 सप्टेंबर (शनिवार) पासून सुरू होईल आणि फायनल 8 नोव्हेंबरला (रविवारी) होईल. ही 51 दिवसांची ही विंडो फ्रँचायझी, तसेच प्रसारक आणि इतर भागधारकांना अनुकूल ठरेल, अशी माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला दिली. दरम्यान, युएईमध्ये तीन क्रिकेट स्टेडियम आहेत, ज्यात कदाचित आयपीएल सामने खेळवले जाऊ शकतात. यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबू धाबीचे शेख जायद स्टेडियम आणि शारजाह मैदान आहे.