IPL 2020: मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा पूर्ण करणार षटकारांचे द्विशतक, 'हे' 4 आयपीएल रेकॉर्ड करण्याच्या तयारीत हिटमॅन, जाणून घ्या
रोहित शर्मा (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्राचे काउंटडाउन सुरु झाले आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्समधील (Chennai Super Kings) पहिल्या सामन्याने नवीन सत्राची सुरुवात होईल. युएईमध्ये अबू धाबी (Abu Dhabi) येथे हा सामना रंगणार असून दोन्ही टीम या लढतीसाठी सज्ज आहेत. रोहित शर्मा पुन्हा मुंबईचे नेतृत्व करेल, तर एमएस धोनी चेन्नईचे नेतृत्व करेल. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील काही नवीन रेकॉर्ड बनतील तर काही जुने रेकॉर्ड तोडण्यात येतील. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील काही रेकॉर्ड्स यंदा त्याच्या नावे करून घेण्याच्या तयारीत असेल. मागील वर्षी चेन्नईचा पराभव करून मुंबईने विक्रमी चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकले. मुंबई इंडियन्सला युएई येथे साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे, यंदा मुंबईवर युएई येथील आपला रेकॉर्ड सुधरवण्यासाठी मोठा दबाव असेल. (Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्स लाइनमध्ये 'हे' 4 परदेशी खेळाडू संपूर्ण सीझन करू शकतात पैसा वसूल कामगिरी!)

मुंबईच्या सुरुवातीच्या काही सामन्यात कर्णधार रोहित काही रेकॉर्ड त्याच्या नावावर करण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून रोहितकडे पाहिले जाते. त्याने 7 हंगामात मुंबईचे कर्णधार म्हणून नेतृत्व केले ज्यातील 4 मध्ये त्याने विजेतेपद जिंकले. यंदाच्या हंगामात रोहितला 'हे' 4 रेकॉर्ड करण्याची संधी असेल.

1. रोहितने आजवर आयपीएलमध्ये तिसऱ्या सर्वाधिक 4898 धावा केल्या आहेत. रोहितला 5000 धावा करण्यासाठी 102 धावांची गरज आहे आणि असे केल्यास तो 5000 धावा पूर्ण करणारा तिसरा खेळाडू ठरेल. यापूर्वी सुरेश रैना आणि विराट कोहलीने हा टप्पा गाठला आहे.

2. रोहितने या हंगामात 7 षटकार मारले तर तो मुंबई इंडियन्ससाठी 150 षटकार मारणाराही पहिला खेळाडू ठरेल. रोहित 2011 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि त्याने आजवर 143 षटकार मारले आहेत.

3. 2011 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यापासून रोहितने फ्रँचायझीअस्थी 3,728 धावा केल्या आणि 2020 सीझनमध्ये 272 धावा करताच रोहित मुंबई इंडियन्ससाठी 4000 रन करणारा पहिला खेळाडू ठरेल.

4. आणखी एक रेकॉर्ड रोहितच्या प्रतीक्षेत आहे आणि तो म्हणजे षटकारांचे द्विशतक करण्याचा. रोहित यंदा स्पर्धेत 6 षटकार मारताच आयपीएलमध्ये 200 षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील होईल. यापृवी क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि एमएस धोनी यांनी हा टप्पा गाठला आहे.

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील 19 सप्टेंबर रोजी सलामीच्या सामान्याने आयपीएलच्या 13व्या हंगामाची सुरुवात होईल. हा सामना अबू धाबीमधील शेख झायद स्टेडियमवर खेळला जाईल. रोहित आणि सहकारी निश्चितपणे स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वात आवडता संघ असेल कारण त्यांचा कागदावर सर्वात मजबूत संघ आहे.