मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: PTI)

गतविजेत्या मुंबई इंडियन्स रेड हॉट फॉर्ममध्ये असून विक्रमी पाचवे आयपीएल विजेतेपद जिंकण्यासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएलचा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. यंदाच्या 13व्या हंगामात दोन्ही संघ तीन वेळा आमने-सामने आले आणि अनुभवी मुंबईने वर्चस्व गाजवले आहे. मुंबई इंडियन्स साखळी सामन्यात दोनदा तर क्वालिफायरमध्ये लढत झाली आणि मुंबईने तिनही वेळी दिल्लीवर एकतर्फी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा दिल्लीचा सामना करणार. श्रेयस-अय्यरच्या नेतृत्वात संघाने क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैदराबादला 17 धावांनी पराभूत केले आणि पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला. (IPL 2020 Final: DC विरुद्ध आयपीएल फायनल सामन्यात MI कर्णधार रोहित शर्मा 'हे' मोठे पराक्रम करण्याची संधी, वाचा सविस्तर)

मुंबईने सहाव्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे आणि संघ जेतेपदही जिंकू शकतो याविषयीची तीन करणं आपण आज या लेखात जाणून घेणार आहोत.

1. उत्तम फलंदाजीचा क्रम

मुंबई इंडियन्सच्या सलामीवीरांसह प्रत्येक फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. फायनलमध्ये क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा खूप महत्त्वपूर्ण ठरतील, रोहित यंदाच्या मोसमात काही खास कामगिरी करू शकला नाही पण हिटमॅन जर जास्त काळ क्रीजवर थांबला तर गोलंदाजांना किती धोकादायक ठरू शकतो हे सांगण्याची गरज नाही. या फलंदाजांव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन देखील यंदाच्या मोसमात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. फायनलमध्ये दोघेही महत्त्वाचे सिद्ध होणार आहेत. जर दिल्लीला ऐतिहासिक विजय मिळवायचा असेल तर या दोन फलंदाजांना लवकरच पॅव्हेलियनमध्ये पाठवावे लागेल.

2. धोकादायक जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट

यंदाच्या मोसमात मुंबईची वेगवान जोडी-जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. मुंबईसाठी या दोन्ही गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने 14 सामन्यात 27 तर बोल्टने तितक्याच सामन्यात 22 विकेट घेतल्या आहेत. हे दोघे गोलंदाज सुरुवातीला पॉवर-प्लेमध्ये किती धोकादायक होऊ शकतात हे सांगायची गरज नाही. यापूर्वी पहिल्या क्वालिफायरमध्ये पॉवर-प्लेमध्ये चार फलंदाजांना माघारी धाडलं होतं. या दोघांनी मिळून एकूण 49 विकेट्स घेतल्या आहेत.

3. अनुभवी खेळाडू

मुंबई इंडियन्स आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. त्यांनी सर्वाधिक चार वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले असून मोठ्या आणि दबावाच्या सामन्यांमध्ये खेळण्याचा संघाला बराच अनुभव आहे. मुंबईमध्ये रोहित शर्मा, बोल्ट, बुमराह, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि डी कॉक यासारखे आंतरराष्ट्रीय अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.

दरम्यान, 2010 मध्ये अंतिम फेरी गाठल्यानंतर मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला होता, त्यामुळे अंतिम फेरी गाठल्यानंतर मुंबई संघाला जेतेपद मिळवता आले नाही असे आजवर एकदाच घडले आहे. 2010 फायनलमध्ये मुंबईला चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव पत्करावा लागला होता.