IPL 2020: सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन करण्यास भारतीय बोर्ड उत्सुक, BCCI सूत्रांची माहिती
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter)

कोविड-19 (COVID-19) महामारी दरम्यान क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) 25 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या आवृत्तीचे आयोजन करण्याची शक्यता पाहत आहे. करोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीसीसीआयने सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलल्या आहेत. यंदाचे आयपीएलही (IPL) बीसीसीआयने पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केलंय. मात्र, टूर्नामेंट रद्द झाल्यास भारतीय बोर्डाला तब्बल 4 हजार कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे, त्यामुळे आर्थिक तोटा टाळण्यासाठी बीसीसीआय वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची तपासणी करत आहे. आयएएनएसशी बोलताना, घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, बीसीसीआय सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत कोरोना व्हायरसनंतरच्या काळात आयपीएल आयोजित करण्याची शक्यता पाहत आहे. (क्रिकेट फॅन्ससाठी खुशखबर! कोरोना काळात ऑस्ट्रेलियामध्ये 6 जूनपासून सुरु होणार स्पर्धात्मक क्रिकेट, खेळाडूंना करावे लागणार 'या' नियमांचे पालन)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय 25 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या काळात आयपीएलचे आयोजन करण्याच्या विचारात आहे. “अद्याप हे सुरुवातीचे दिवस आहेत कारण या गोष्टी प्रत्यक्षात येण्यासाठी बर्‍याच इतर गोष्टी घडायच्या आहेत, पण बीसीसीआय 25 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबर या विंडोकडे पहात आहे. यासाठी परिस्थितीमध्ये सुधारणा होणं आणि सरकारची परवानगी मिळणं गरजेचं आहे. मी म्हटल्याप्रमाणे अनेक गोष्टी जुळून येणं गरजेचं आहे, पण हो, या तारखांविषयी बोलले जात आहे आणि आकस्मिक नियोजन चालू आहे, ”असे सूत्रांनी म्हटले. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने देशातील Sports Complex आणि मैदानं उघण्याची परवानगी दिली होती. मात्र परिसरात प्रेक्षकांना हजर राहण्याची परवानगी मिळणार नाहीये. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनावर सरकार नेमकं काय निर्णय घेतलंय हे पाहणं औत्सुकतेचे ठरणार आहे.

दुसरीकडे, या तारखांदरम्यान आयपीएलचे आयोजन होण्यासाठी आगामी टी-20 वर्ल्ड कप स्थगित होणे आवश्यक आहे जे 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केले जाणार आहे. मात्र, नियोजित वेळापत्रकानुसार देशासाठी या स्पर्धेचे आयोजन करणे जवळजवळ अशक्य होईल असं राष्ट्रीय टी-20 संघातील खेळाडूंचे मत आहे.