युवराज सिंह, इंडिया लेजेंड्स (Photo Credit: Twitter)

IND(L) vs SA(L) Road Safety World Series 2021: ‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारताचा माजी आक्रमक फलंदाज युवराज सिंहने (Yuvraj Singh) शनिवारी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या 13व्या सामन्यात आतीशी खेळी केली. त्याने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दिग्गज गोलंदाज जेंडर डी ब्रुयनच्या (Zander de Bruyn) एका ओव्हरमध्ये चार चेंडूंमध्ये चार खणखणीत षटकार ठोकले. त्याने 21 चेंडूत एका षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान त्याने 6 षटकार आणि दोन चौकार ठोकले आणि 22 चेंडूत 52 धावा करून नाबाद परतला. युवराजने या सामन्याच्या 18व्या ओव्हरमध्ये चार चेंडूंवर सलग 4 षटकार ठोकत आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा जुन्या युवीची आठवण करून दिली. युवराजला भारताचा सिक्सर किंग म्हणतात. यापूर्वी, युवीने टी-20 वर्ल्ड कप 2007 मध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये सलग 6 षटकारही ठोकले होते. युवीच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिका लेजेंड्सपुढे विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. (India Legends vs South Africa Legends: Sachin Tendulkar याचा झंझावाती रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये धमाका, 30 चेंडूत ठोकले झंझावाती अर्धशतक)

दुसरीकडे, संघासाठी कर्णधार सचिन तेंडुलकरने सर्वाधिक 60 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. सचिनने आपल्या शानदार खेळीच्या वेळी 37 चेंडूंचा सामना करत नऊ चौकार व एक षटकार ठोकला. तेंडुलकरशिवाय इंडिया लेजेंड्सचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागने चौकारांसह आठ चेंडूत एका चौकारासह 6 धावा, सुब्रमण्यम बद्रीनाथने दुखापतीमुळे मैदानाबाहेर जाण्यापूर्वी 34 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. युसुफ पठाणने 10 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 23 धावा तर मनप्रीत गोनीने 9 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 16 धावांची खेळी केली. गोनी आणि युवराज यांच्यात 63 धावांची भागीदारी झाली.

दरम्यान, उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इंडिया लेजेंड्ससाठी आजचा सामना खूप महत्वाचा आहे. जर आज दक्षिण आफ्रिकेला भारताने हरवले तर ते सेमीफायनलमधील स्थान सुरक्षित करेल. यापूर्वी, संघाला इंग्लंडविरुद्ध 6 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या सामन्याबद्दल बोलतायचे तर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीसाठी भारताला आमंत्रित केले.