
भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) टी-20 मालिकेचा अंतिम सामना मंगळवारी गयानामधील (Guyana) प्रोव्हिडन्स स्टँडियममध्ये खेळण्यात येईल. या सामन्यात वेस्ट इंडिज विजय मिळवेल किंवा भारत व्हाईट वॉश पूर्ण करेल यावर सर्वांचे लक्ष लागून असेल. 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत सलग दोन सामन्यात विजय मिळवत भारताने 2-0 अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात देखील विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा निर्धार असेल. दुसरीकडे, विंडीज संघाने मागील दोन्ही सामन्यात वाईट कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात फलंदाजांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या टी-20 सामन्यात विंडीज संघाला फक्त 95 धावा करता आल्या. कमी धावांचा पाठलाग करत असलेल्या भारतीय संघाला विंडीज गोलंदाजांनी अक्षरशः रडवले आणि 69 धावांवर अर्धा भारतीय संघ माघारी परतला. (IND vs WI 3rd T20I मॅचआधी कीरोन पोलार्ड याला ICC चा दणका, आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल सामना शुल्काच्या 20% दंड)
आजच्या तिसरा आणि अंतिम टी-20 सामन्यात समाधानकारक विजय मिळवण्याचा विंडीज संघाचा निर्धार असेल. पण या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारी पूर्ण दिवस गयानामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यावर पावसाचे संकट असल्याचे म्हटले जात आहे. याआधी दुसऱ्या सामन्यातदेखील पावसाने व्यत्यय आणला होता, परिणामी विंडीजला 15 ओव्हरपर्यंत फलंदाजी करता आली होती. सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे सामना थांबवण्याचा आला. आणि अखेरीस डकवर्थ-लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आले होते.
दरम्यान, आजच्या सामना झाल्यास भारतीय संघात काही बदल करून येण्याची शक्यता आहे. भारताने आधीच मालिका जिंकली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांची बेंच स्ट्रेंथ टेस्ट करण्याची चांगली संधी आहे. आजच्या सामन्यात लोकेश राहुल. श्रेयस अय्यर, राहुल चाहर आणि दीपक चाहर यापैकी खेळाडूंची संघात निवड होण्याची शक्यता आहे.