India vs New Zealand 4th ODI: न्युझीलंडविरुद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. न्युझीलंडने 8 गडी राखत भारतावर विजय मिळवला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. पराभवानंतर रोहित शर्मा म्हणाला की, "सेडॉन पार्क मैदानावर फलंदाजी करणे सोपे होते. मात्र टीम इंडिया यात अपयशी ठरली. दिर्घ काळानंतर आम्ही इतकी वाईट फलंदाजी केली असून ही सर्वात वाईट कामगिरी होती. याचे सारे श्रेय न्युझीलंडच्या गोलंदाजांचे आहे. आमच्यासाठी हा एक धडा आहे." (न्युझीलंड विरुद्ध भारत चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दारुण पराभव; 8 विकेट्सने केली मात)
यापुढे रोहित म्हणाला की, "मालिका जिंकण्याचा अर्थ असा नाही की आम्ही आरामात बसून राहू. आम्ही पुढे जाणे सुरु ठेवले पाहिजे. चांगला संघ सातत्याने चांगली कामगिरी करत असतो. आता आम्हाला वेलिंग्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या पाचव्या एकदिवसीय सामन्याची प्रतिक्षा आहे."
न्युझीलंडने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्युझीलंडच्या तगड्या गोलंदाजीपुढे भारतीय संघाचा टिकाव लागला नाही. 14.4 ओव्हरमध्ये केवळ 92 धावांत त्यांनी टीम इंडियाचा खुर्दा केला. त्यानंतर अवघ्या 93 धावांचे लक्ष्य न्युझीलंडने सहज साध्य केले. पाच सामन्यांच्या या एकदिवसीय मालिकेत भारताने पहिले तीन सामने जिंकले असून न्युझीलंडचा हा पहिलाच विजय आहे.