India vs New Zealand 3rd T20I: तिसऱ्या T20 सामन्यात भारत 4 धावांनी पराभूत; न्युझीलंड संघाचा मालिका विजय
New Zealand win by 4 runs (Photo Credit: Twitter)

India vs New Zealand 3rd T20I: न्युझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात भारताचा पराभव झाला. न्युझीलंडने केवळ 4 धावांनी भारतावर विजय मिळवला. न्युझीलंडने भारतापुढे 213 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने जिद्दीने लक्ष्याचा पाठलाग केला. मात्र विजयाने भारतीय संघाला हुलकावणी दिली. सेडॉन पार्क (Seddon Park) येथे रंगलेला आजचा सामना निर्णायक होता. यापूर्वी झालेल्या दोन सामन्यात दोन्ही संघाने 1-1 अशी बरोबरी केली होती. त्यामुळे मालिका विजयासाठी आजचा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा होता. मात्र अटीतटीचा हा सामना न्युझीलंडने जिंकत मालिका आपल्या नावावर केली.

नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र आज न्युझीलंडने तगडी फलंदाजी करत 212 धावा केल्या. न्युझीलंडने केवळ चार विकेट्स गमावत भारतापुढे मोठे आव्हान उभे केले. भारतीय संघाकडून रोहित शर्माने 38, शिखर धवन 5, ऋषभ पंत 28, विजय शंकर 43, महेंद्र सिंह धोनी 2, हार्दिक पंड्या 21 तर दिनेश कार्तिक आणि क्रुणाल पंड्या यांनी अनुक्रमे 33 आणि 26 धावांचे योगदान दिले. टी-20 सामन्यांमध्ये विराट कोहलीला आराम देण्यात आला असून रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरली होती. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्युझीलंडने 2 सामने जिंकत मालिकेवर विजय प्राप्त केला आहे.