भारतीय संघ ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) दौऱ्यावर असून यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या मालिकेत फॉर्ममध्ये असलेल्या अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या मालिकेतील अखेरच्या कसोटी सामन्याआधीच संघातून बाहेर झाला आहे. दरम्यान, रविंद्र जाडेजाच्या जागी कोणत्या खेळाडूला संधी देण्यात येणार? याबाबात अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
सिडनी कसोटी सामन्याच्या तिसर्या दिवशी मिशेल स्टार्कच्या बाऊंस बॉल खेळत असताना रविंद्र जडेजाच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दरम्यान, फिझिओने त्याच्यावर उपचार केल्यानंतर जाडेजाने फलंदाजीदेखील केली होती. मात्र, दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात आलाच नाही. या मालिकेत जाडेजाने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. यामुळे भारतीय संघाला रविंद्र जाडेचाची कमरतता भासण्याची शक्यता आहे. त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यात चांगली गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले होते. हे देखील वाचा- IND vs AUS 3rd Test Day 3: तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची मजबूत आघाडी, स्टिव्ह स्मिथ-मार्नस लाबूशेनची अर्धशतकी भागीदारी
सिडनी कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जडेजाने 4 विकेट घेतले होते. तर, क्षेत्ररक्षण करत असताना 131 धावांवर खेळत असणाऱ्या स्टीव्ह स्मिथला रन आऊटदेखील केले होते. या दुखापतीमुळे तो दोन ते तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहू शकतो, असे बीसीसीआयच्या एका सूत्रांनी पीटीआयला सांगितले. या दुखापतीमुळे जडेजा ग्लब्ज घालू शकत नाही, यामुले तो योग्यरित्या फलंदाजी करु शकत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, चांगली बातमी अशी आहे की, यष्टीरक्षक रिषभ पंत यांची दुखापत गंभीर नसून तो संघासोबत खेळण्याची शक्यता आहे.