India Tour of England 2021: टीम इंडियामध्ये इंग्लंड विरोधात या 3 खेळाडूंना स्थान मिळणं कठीण, कदाचित बेंचवर बसून काढतील संपूर्ण दौरा
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

India Tour of England 2021: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघ इंग्लंड दौऱ्यावर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात भिडणार आहेत. पहिल्यांदा कसोटी अजिंक्यपद जिंकून टीम इंडिया (Team India) सुवर्ण अक्षराने इतिहास रचण्यासाठी उत्सुक असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यानंतर भारतीय संघ (Indian Team) इंग्लंड (England) विरोधात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन हात करेल. पण ही मालिका तितकी सोपी होणार नाही. इंग्लंड दौऱ्यासाठी 20 भारतीय सदस्यांची टीम घोषित करण्यात आली असून यामध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच युवा खेळाडूंचा देखील समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड दौरा हा भारतासाठी नेहमीच महत्वाचा ठरला आहे. ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडच्या बलाढ्य संघाला घरच्या मालिकेत पराभूत करण्यासाठी टीम इंडिया उत्सुक असेल. (IND vs ENG Test 2021: राहुल द्रविडने केली मोठी भविष्यवाणी; Team India इतक्या फरकाने ब्रिटीशांना देईल धोबीपछाड, या 2 खेळाडूंमधील मुकाबला ठरेल मनोरंजक)

इंग्लंड विरोधात भारतीय संघाचा प्लेइंग इलेव्हन जवळपास निश्चित झाला असल्यामुळे आपण तीन खेळाडूंवर नजर टाकूया जे कदाचित संपूर्ण दौऱ्यावर बेंचवर बसून अन्य खेळाडूंना पाणी पाजताना दिसू शकतात.

रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha)

कसोटी क्रिकेटमध्ये साहा हा भारतीय संघाचा मुख्य भाग होता परंतु गेल्या काही काळात रिषभ पंतने चमकदार कामगिरीच्या जोरावर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पंतने इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेत शतकी खेळी केली होती त्यामुळे संघाच्या मधल्या फळीत साहाच्या जागी पंतला प्राधान्य दिले जाऊ शकते.

हनुमा विहारी (Hanuma Vihari)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्ध विहारीला संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर विहारीने काही खास केले नाही. त्याने पाच डावात फक्त 72 धावा केल्या. शिवाय काऊंटी क्रिकेटमध्ये देखील तो अपयशी ठरला आहे ज्यामुळे इंग्लंड दौऱ्यावर त्याच्याजागी दुसऱ्या कोणत्या फलंदाजाचा विचार केला जाऊ शकतो.

केएल राहुल (KL Rahul)

भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये अद्याप फारशी कमाल करू शकलेला नाही. 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तो अखेर कसोटी क्रिकेट खेळला जिथे तो फ्लॉप ठरला. शिवाय अजिंक्य रहाणे, पंतच्या उपस्थितीत राहुलला मधल्या फळीत संधीची शक्यता कमी दिसत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर इंग्लंडच्या भारत दौऱ्यावरही राहुलला कसोटी मालिकेसाठी संधी मिळाली नव्हती.