विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

इंडियन प्रीमिअर लीग 2020 चा हंगाम संपुष्टात येताच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय मालिकेत दोन्ही संघात 3 वनडे आणि टी-20 तर 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. 27 नोव्हेंबरपासून दौऱ्याची सुरुवात होईल. पण, भारताचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. PTIच्या अहवालानुसार कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा आपल्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी भारतात परत येऊ शकतात. अनुष्का ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार नसल्याचीही त्यांनी पुष्टी केली आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे बीसीसीआयने खेळाडूंच्या पत्नी आणि मुलांना ऑस्ट्रेलियामध्ये जाण्याची परवानगी दिली आहे. PTIशी बोलताना सूत्राने सांगितले की, कोहलीला अंतिम दोन कसोटी सामन्यात न खेळण्याची मुभा देण्यास बीसीसीआयची हरकत नाही. (IND vs AUS 2020-21: स्टीव्ह वॉ यांचा ऑस्ट्रेलिया संघाला सल्ला; भारतीय संघाच्या 'या' फलंदाजाला 'स्लेज' करू नका, नाहीतर पडेल भारी!)

विराट आणि अनुष्का जानेवारी 2021 मध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देतील. "कुटुंबाला प्राधान्य दिले पहिले असाबीसीसीआयचा नेहमीच विश्वास राहिला आहे. जर कर्णधार पितृत्व ब्रेक घेण्याचा निर्णय घेत असेल तर तो फक्त पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असेल," बोर्डाच्या वरिष्ठ सूत्रांनी म्हटले. भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान बीसीसीआयने रोहित शर्माला मुलगीच्या जन्मासाठी भारतात परत जाण्याची परवानगी दिली होती. तो चौथा कसोटीला मुकला होता तर वनडे आणि टी-20 मालिकेसाठी परतला होता. सध्याची परिस्थिती आणि अनिवार्य क्वारंटाइन कालावधी पाहता कोहलीला भारतात येऊन आणि नंतर अंतिम दोन सामने खेळण्यासाठी परतणे शक्य होणार नाही.

चार कसोटी सामने अ‍ॅडिलेड, मेलबर्न, सिडनी आणि ब्रिस्बेन येथे आयोजित केली जाणार आहे. अ‍ॅडिलेड येथे 17 ते 21 डिसेंबर दरम्यान पिंक-बॉल टेस्टने मालिकेची सुरुवात होईल. पारंपारिक बॉक्सिंग डे कसोटी 26 डिसेंबरपासून सुरू होईल. भारतीय संघाच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्यांनी कांगारू संघाचा त्यांच्या घरी खेळताना कसोटी मालिकेत पराभव करून डाऊन अंडर मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ बनून इतिहास रचला होता.