IND vs PAK: आशिया कपमध्ये भारत - पाकिस्तानचा सामना होणार 'या' दिवशी, वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेण्याची आहे संधी
Asia Cup 2022, IND vs PAK (Photo Credit - Twitter)

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. हा सामना 28 ऑगस्टला होऊ शकतो. या सामन्यात पाकिस्तानला हरवून टीम इंडियाला 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमधील (T-20 World Cup) पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल. आशिया चषक 2022 चे यजमानपद श्रीलंकेकडे (Sri Lanka) आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित केली जाऊ शकते, अशी अटकळ पूर्वी होती, परंतु आता ही स्पर्धा वेळापत्रकानुसार श्रीलंकेतच खेळवली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ऍशले डिसिल्वा यांनी आशियाई क्रिकेट परिषदेलाही यासाठी पटवून दिले आहे. यावेळी आशिया चषक टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे, कारण यानंतर टी-20 वर्ल्ड कपही आयोजित केला जाणार आहे. या स्पर्धेत भारत आपले विजेतेपद राखण्यासाठी उतरेल. 27 ऑगस्टपासून मुख्य फेरीचे सामने सुरू होतील. त्याआधी पात्रता फेरी खेळली जाईल.

भारताचा 10 गडी राखून पराभव 

2021 च्या T20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध होता आणि या सामन्यात टीम इंडियाला 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव होण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी एकदिवसीय किंवा टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला भारताला हरवता आले नव्हते. 2021 च्या T20 विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारत लीग स्टेजमधून बाद झाला. आता टीम इंडियाला या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG T20: सामना गमावल्यानंतर कर्णधार जोस बटलरने दिली प्रतिक्रिया, 'या' भारतीय गोलंदाजांचे केलं कौतुक)

'या' संघांमध्ये होणार सामने

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानने आशिया चषक 2022 च्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे, परंतु संघाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. पात्रता फेरीत यूएई, ओमान, नेपाळ आणि हाँगकाँग हे संघ भाग घेणार आहेत. येथील विजयी संघ मुख्य फेरीत प्रवेश करेल.