
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND VS NZ ) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (ICC Champions Trophy) अंतिम सामना आज 9 मार्च (रविवार) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघ 12 वर्षांनंतर हे विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात, सर्व भारतीय खेळाडूंकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर आहेत. या सामन्यात कोहलीला इतिहास रचण्याची आणि अनेक मोठे विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे. हेही वाचा: IND vs NZ, ICC Champions Trophy 2025 Final Match Stats And Preview: टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात चुरशीचा सामना; आज 'हे' मोठे विक्रम होऊ शकतात
कोहलीचे लक्ष्य संगकाराच्या विक्रमाकडे
विराट कोहलीने आतापर्यंत 301 एकदिवसीय सामन्यांच्या 289 डावांमध्ये 58.11 च्या प्रभावी सरासरीने आणि 93.35 च्या स्ट्राईक रेटने 14,180 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 51 शतके आणि 74 अर्धशतके झळकावली आहेत. तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे. जर कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात आणखी 55 धावा केल्या तर तो श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराला मागे टाकून एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
1 सचिन तेंडुलकर – 18,426 धावा
2 कुमार संगकारा – 14,234 धावा
3 विराट कोहली – 14,180 धावा
4 रिकी पॉन्टिंग – 13,704 धावा
संगकाराने 404 एकदिवसीय सामन्यांच्या 380 डावांमध्ये 14,234 धावा केल्या. 2015 पासून तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. जर कोहलीने या सामन्यात चांगली कामगिरी केली तर 10 वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेटमधील टॉप-2 फलंदाजांच्या यादीत बदल होईल आणि विराट कोहली दुसऱ्या स्थानावर पोहचेल.