
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना (ICC Chmapions Trophy 2025 Final) आज म्हणजेच 9 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs NZ) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे होते. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर होती.
JADEJA HITS THE WINNING RUNS TO SEAL INDIA'S THIRD CHAMPIONS TROPHY TITLE 🏆 pic.twitter.com/hgk3yOlDaX
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 9, 2025
न्यूझीलंडने दिले होते 252 धावांचे लक्ष्य
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने 50 षटकांत 7 विकेट गमावून 251 धावा केल्या. न्यूझीलंडकडून स्टार अष्टपैलू डॅरिल मिशेलने 63 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, डॅरिल मिशेलने 101 चेंडूत तीन चौकार मारले. डॅरिल मिशेल व्यतिरिक्त, मायकेल ब्रेसवेलने नाबाद 53 धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी शानदार फलंदाजी केली आणि फक्त 112 चेंडूत 105 धावा केल्या. टीम इंडियाने 49 षटकांत फक्त सहा विकेट गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियाकडून कर्णधार रोहित शर्माने 76 धावांची सर्वोत्तम खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान रोहित शर्माने 83 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकार मारले. रोहित शर्मा व्यतिरिक्त श्रेयस अय्यरने 48 धावा केल्या.
न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मिचेल सँटनर आणि मायकेल ब्रेसवेल व्यतिरिक्त काइल जेमिसन आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. टीम इंडियाने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सुमारे आठ महिन्यांत दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत.