भारत महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

IND W vs WI W, World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women's World Cup) 2022 च्या 10 व्या सामन्यात भारताने (India) वेस्ट इंडिज (West Indies) संघाला 155 धावांनी धूळ चारली. प्रथम फलंदाजी करून टीम इंडियाने (Team India) विंडीजसमोर 318 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि उपकर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांनी शतकी खेळी केली. आयसीसी महिला विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडियाने प्रथमच तीनशे पार धावांचा पल्ला गाठला आहे. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना कॅरेबियन संघ 162 धावांत गारद झाला आणि भारताने स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला तर विंडीजचा हा स्पर्धेतील पहिला पराभव ठरला. भारताकडून स्नेह राणा (Sneh Rana) हिने 22 धावा देऊन सार्वधिक 3 विकेट घेतल्या. तर अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी विंडीजच्या अनिसा मोहम्मद हिला बाद करून स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 40 विकेट घेणारी नंबर 1 महिला गोलंदाज बनली. (Jhulan Goswami Scripts World Record: विश्वचषकात झुलन गोस्वामी सुसाट! विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज बनून घडवला इतिहास)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यस्तिका भाटिया आणि स्मृती मंधाना यांनी टीम इंडियाला ताबडतोड सुरुवात करून दिली. यस्तिकाने 31 धावांचे योगदान दिले, पण ती बाद होताच फलंदाजीला तिसऱ्या क्रमांकावर उतरलेली कर्णधार मिताली राज 5 आणि दीप्ती शर्मा 15 धावा करून स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतल्या. लक्षात घ्यायचे की सामन्यात एक वेळ अशी होती की भारताने चांगली सुरुवात करूनही 78 धावांत तीन विकेट गमावल्या होत्या. यानंतर हरमनप्रीत कौर आणि स्मृती यांनी मोर्चा सांभाळला व विक्रमी भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. मंधाना आणि हरमनप्रीतच्या या अप्रतिम भागीदारीमुळे भारताला पहिल्यांदाच विश्वचषकात 300 धावांचा टप्पा ओलांडल. तसेच हरमनप्रीत कौरचे विश्वचषकातील हे तिसरे शतक असून अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे, तर मंधानाचे विश्वचषकातील हे दुसरे शतक आहे.

दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना डिआंड्रा डॉटिन आणि हेली मॅथ्यूज यांनी 12.2 षटकांत पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भर घातली. दुखापतीनंतरही डॉटिन शानदार फलंदाजी करत होती, तिने 10 चौकार आणि 1 षटकारासह 62 धावांची तुफानी खेळी केली. तिला स्नेह राणाने बाद करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. डॉटिनची विकेट पडल्यानंतर वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ पत्त्याच्या गठ्ठासारखा कोसळला आणि वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या 40.3 षटकांत 162 धावांत गुंडाळला. विशेष म्हणजे डॉटिन बाद झाल्यानंतर संपूर्ण संघाला 62 धावांची भर घालता आली.