IND-W vs SA-W T20I 2019: हरमनप्रीत कौर ची विक्रमी खेळी; विराट कोहली, मिताली राज सह 'या' एलिट यादीत झाला समावेश
हरमनप्रीत कौर (Photo: Getty Images)

भारतीय महिला क्रिकेट संघाने (India Women's Cricket Team) आपली शानदार कामगिरी सुरू ठेवली आणि पाचव्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा पराभव केला. सुरतमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 मॅचमध्ये कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) च्या नाबाद 34 धावा आणि राधा यादव (Radha Yadav) च्या तीन विकेटमुळे भारतीय संघाने पाच गडी राखून विजय मिळविला. पहिले फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचा (South Africa Women) संपूर्ण संघ 20 ओव्हरमध्ये 8 गडी गमावून केवळ 98 धावा करू शकला आणि भारतासमोर 99 धावांचे सोपे लक्ष्य ठेवले. भारताकडून राधा यादवने तीन तर दीप्ती शर्मा (Deepti Sharma) ने दोन गडी बाद केले. या दरम्यान, भारताची टी-20 कर्णधार हरमनप्रीतने एका विक्रमला गवसणी घातली. हरमनप्रीतने महिला आफ्रिका संघाविरुद्ध नाबाद 34 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान, कौरने 99 टी-20 मॅचमध्ये 2003 धावा केल्या आहेत.

यासह हरमनप्रीत कौर चौथी भारतीय आणि दुसरी महिला क्रिकेटपटू बनली जिने टी-२० मध्ये 2000 धावा केल्या आहेत. यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि मिताली राज (Mithali Raj) यांनी टी-20 मध्ये 2000 धावांचा टप्पा गाठला आहे. विराटने आजवर टी-20 मध्ये 2450, रोहितने 2443 आणि मितालीने 2364 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 2000 धावा पूर्ण करणारी हरमनप्रीत आठवी महिला खेळाडू आहे. मिथाली राज टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी मितालीने टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. याचा अर्थ असा देखील होतो की, हरमनप्रीतला आता मिथालीला मागे टाकण्याची संधी उपलब्ध आहे.

दरम्यान, महिलांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडच्या आंतरराष्ट्रीय सुझी बेट्स ने सर्वाधिक धावा केल्या आहेत. टी -20 मध्ये 3000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा करणारी बेट्स देखील एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. बेट्सने 111 टी -20 सामन्यातून 3100 धावा आहेत. टी -20 आयमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्याच्या यादीत कौर आठव्या स्थानावर आहे तर संघातील सहकारी राज एलिट यादीत सहाव्या स्थानावर आहे.