भारतीय संघ (Indian Team) सोमवारी मध्यरात्री वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज संघातली ही आगामी सिरीज रंगतदार होणार आहे. भारताचा विंडीज दौरा 3 ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. या दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज संघ 3 टी-20, 3 वनडे आणि 1 टेस्ट सामने खेळतील. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर दोन्ही संघाचा पहिली मालिका असणार आहे. भारतीय संघ एकीकडे सेमीफायनलमध्ये पराभूत झाला तर विंडीज संघाला साखळी सामन्यातच गाशा गुंडाळाव्या लागल्या. दोन्ही संघात तुफान खेळी करणारे टी-20 खेळाडू आहे. त्यामुळे या दोन्ही संघातील मालिका रंगतदार होईल यात शंका नाही. (वेस्ट इंडिजच्या कॉट्रेलचा Lt Colonel एमएस धोनी याला ‘शेल्डन सॅल्यूट’; प्रेरणादायी म्हणून केला सम्मान, पहा हे Tweet)
दुसरीकडे, सर्वांच्या नजरा असतील त्या भारतीय संघाचे कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याकडे. विश्वचषकमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली असे वृत्त समोर आले होते. विश्वचषकनंतर भारतीय संघात विराट आणि रोहित असे दोन गट आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे दोन्ही खेळाडू त्यांच्यातील वाद विसरून संघासाठी कसा खेळ करतात यावर सर्वांच्या नजारा लागून असतील. पण दोन्ही संघाच्या वादाऐवजी अजून तीन कारणांसाठी या दोघांवर सर्वांचे लक्ष लागून असेल. आणि ते म्हणजे या दौऱ्यादरम्यान दोन्ही खेळाडूंना काही प्रस्थापित विक्रम मोडण्याची संधी मिळत आहे. टी-20 मालिकेमध्ये जेव्हा भारत वेस्ट इंडिजचा सामना करेल तेव्हा या दोन प्रख्यात खेळाडूंना काही प्रस्थापित रेकॉर्डस् मोडत पुढे जाण्याची संधी आहे. आपण पाहूया ते 3 रेकॉर्ड जे पुढील महिन्यात मोडले जाऊ शकतात:
वेस्ट इंडीज विरुद्ध सर्वाधिक 50+ धावा
जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून रोहित शर्मा याने बहुतेक देशांविरुद्ध विक्रमी खेळी केली आहे. विश्वचषकमध्ये देखील त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध हिटमॅनने 10 टी-20 सामन्यात 334 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतके आणि एक शतकाचा समावेश आहे. रोहितने विश्वचषकमध्ये सर्वाधिक 648 धावा केल्या होत्या. रोहितचा सध्याचा फॉर्म पाहता तो विंडीज विरुद्ध देखील यशस्वी खेळी करेल याची सर्वांना अपेक्षा आहे. विंडीजविरुद्ध रोहितला माजी श्रीलंका क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशान याचा टी-20 रेकॉर्ड मोडण्यासाठी आणखी दोन पन्नास किंवा त्याहून अधिक धावांची गरज आहे. दिलशानने विंडीजविरुद्ध 4 पन्नासहून अधिक धावा केल्या आहेत. तर रोहितने ही कामगिरी दोनदा केली आहे. विंडीज विरुद्ध त्याची सर्वोच्च धावसंख्या 96 नाबाद आहे. आगामी टी-20 सामन्यात दोन पन्नासहून अधिक धावा केल्या तर तो विंडीज विरुद्ध दिलशानचा रेकॉर्ड मोडू शकतो.
टी-20 मध्ये फलंदाजाकडून सर्वाधिक चौकार
क्रिकेटविश्वात असा कोणताही विक्रम नाही ज्याच्यावर भारताचा कर्णधार विराट कोहली याने आपले नाव लिहिले नाही. आणि वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्याच टी-20 सामन्यात एक विक्रम मोडण्याची शक्यता सर्वात जास्त आहे ती म्हणजे सर्वात जास्त चौकारांची. विराट देखील दिलशान याचा टी-20 सामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम मोडीत काढू शकतो. विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 सामन्यात दिल्शानच्या 223 चौकारांची बरोबरी केली होती. आणि आता विंडीजविरुद्ध त्याला हा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. दिलशानने 79 सामन्यात 223 चौकार ठोकले तर विराटने 62 सामने खेळले आहेत. अफगाणिस्तानचा धडाकेबाज सलामीवीर मोहम्मद शहजाद देखील 218 चौकारांसह या दोघांच्या मागावर आहे. 207 चौकारांसह हा विक्रम मोडण्याच्या शर्यतीत रोहित आणखी एक दावेदार आहे.
टी-20 मध्ये फलंदाजाकडून सर्वाधिक षटकार
यात कोणतीही शंका नाही की टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक आहे. रोहित टी-20 मध्ये मोठे शॉट खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत त्याला एक विश्वविक्रम खुणावत आहे. हा विश्वविक्रम रचण्यासाठी रोहितला गरज आहे ती फक्त चार षटकारांची. टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून षटकारांचे शतक पूर्ण करणारा रोहित हा पहिला फलंदाज आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर रोहितच्या पुढे वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल आणि न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल हे दोन फलंदाज आहे. रोहितने आजवर 102 षटकार मारले आहे तर गप्टिलने 103 आणि युनिव्हर्स बॉसने 105 षटकारांचा पाऊस पडला आहे. आगामी टी-20 मालिकेत या दोन्ही धडाकेबाज फलंदाजांना मागे सोडत रोहित टी-20 मधील हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.