IND vs WI ODI Series 2022: इंग्लंडवर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत मात केल्यावर वेस्ट इंडिज (West Indies) संघ आता मर्यादित षटकांच्या द्विपक्षीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर (India Tour) येणार आहे. यादरम्यान दोन्ही संघात तीन वनडे आणि तितक्याच टी-20 सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेतील सर्व एकदिवसीय सामने 6 फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जातील. या मैदानावरील टीम इंडियाचा (Team India) विक्रम पाहिला तर तो चांगलाच झाला आहे. येथे त्याने आतापर्यंत 15 सामने खेळले असून 7 सामने जिंकले आहेत. मात्र, या मैदानावर वेस्ट इंडिज विरोधात खेळलेल्या सामन्यांमध्ये भारताचा रेकॉर्ड चिंताजनक राहिला आहे. अहमदाबादच्या खेळपट्टीवर आतापर्यंत विंडीज संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. (IND vs WI T20I 2022: भारताविरुद्ध असा आहे वेस्ट इंडिजचा टी-20 संघ, रोहितच्या ‘हिटमॅन’ आर्मीला देणार काट्याची टक्कर)
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात अहमदाबादमध्ये 5 एकदिवसीय सामने खेळले गेले असून यादरम्यान भारताने केवळ एकच सामना जिंकला आहे. तर 4 सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला आहे. आणि आता ते पुन्हा एकदा गुजरातमध्ये आपली जादू पसरवण्यासाठी सज्ज असतील. तसेच उभय संघांमधील शेवटचा एकदिवसीय सामना डिसेंबर 2011 मध्ये येथे खेळला गेला होता ज्यामध्ये विंडीजने 16 धावांनी विजय मिळवला. तर भारत श्रीलंकेविरुद्ध शेवटचा वनडे खेळला. नोव्हेंबर 2014 मध्ये झालेल्या या सामन्यात भारताने 6 गडी राखून विजय मिळवला होता. दुसरीकडे, अहमदाबादमध्ये खेळलेल्या वनडे सामन्यात विंडीजचा संघ आघाडीवर असला तरी एकूणच टीम इंडियाचा वरचष्मा आहे. भारताने येथे खेळल्या गेलेल्या 15 पैकी 7 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. या मैदानावर त्याने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघांना पराभूत केले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 6, 9 आणि 11 फेब्रुवारी खेळली जाणार आहे. टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल तर किरोन पोलार्ड विंडीज संघाचे नेतृत्व करेल. लक्षात घ्यायचे की भारतीय संघाला गेल्या सामन्यात क्लीन स्वीप पत्करावा लागला आहे तर विंडीजने आपल्या जबरदस्त फॉर्मच्या जोरावर इंग्लंडला पराभूत केले आहे.