भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये वेस्ट इंडिजने 8 विकेटने भारतीय संघाचा पराभव केला. टॉस गमावून पहिले फलंदाजी करत भारताने दिलेल्या 171 धावांचे लक्ष्य विंडीज फलंदाजांनी 18.3 ओव्हरमध्ये आणि 2 गडी गमावून गाठले. वेस्ट इंडिजकडून लेंडल सिमंस (Lendl Simmons) याने सर्वाधिक धावा केल्या. सिमंसने 4 चौकार आणि 4 षटकारांसह 67 धावा केल्या. या विजयासह विंडीजने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. अन्य कोणत्याची भारतीय गोलंदाजाला विंडीज फलंदाजांना बाद करता आले नाही. आता दोन्ही संघातील ही मालिका कोण जिंकेल याचा निर्णय मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये 11 डिसेंबरला होईल. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार किरोन पोलार्ड याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 170 धावा केल्या. शिवम दुबे याने भारताकडून शानदार फलंदाजी केली आणि कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. रिषभ पंत याने नाबाद 33 धावा केल्या. (IND vs WI 2nd T20I: शिवम दुबे याने किरोन पोलार्ड च्या चेंडूंवर लगावली षटकारांची हॅटट्रिक, पाहून तुम्हीही म्हणाल Wow, पाहा Video)
इव्हिन लुईस याच्या रूपात भारताला पहिले यश मिळाले. लुईने 40 धावा केल्या आणि पहिल्या विकेटसाठी सिमंसबरोबर 73 धावांची भागीदारी केली. प्रथम वेस्ट इंडीजची सुरुवात संथ गतीने सुरू झाली. टीम इंडियाकडून काही खराब क्षेत्ररक्षणही केले गेले. परिणामी यजमानांना पराभवाला सामोरे जावे लागले. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याच्या 5 व्या षटकात सुंदरने प्रथम सिमंसला आणि त्यानंतर पंतने लुईसला झेलबाद करण्याची संधी गमावली. यानंतर, सिमन्स आणि लुईस यांनी टीम इंडिया पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.
दरम्यान, अखेरच्या 5 षटकांत टीम इंडियाने अत्यंत खराब फलंदाजी केली. त्यांना केवळ 38 धावा करता आल्या. शेवटच्या सामन्यात अर्धशतक ठोकणारा केएल राहुल या सामन्यात फ्लॉप ठरला. 11 धावा करुन राहुल बाद झाला. यानंतर टीम इंडियाने शिवमला तिसर्या क्रमांकावर पाठवत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. दुबे आणि रोहित शर्मा यांनी मिळून पॉवर प्लेमध्ये 42/1 धावा केल्या.