IND vs WI 2nd ODI: रोहित शर्मा-केएल राहुल यांचे तुफानी शतक, भारताचे वेस्ट इंडिजला विजयासाठी 388 धावांचे लक्ष्य
रोहित शर्मा आणि केएल राहुल (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम स्टेडियममध्ये खेळला जात आहे. विंडीजचा कर्णधार किरोन पोलार्ड याने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला, पण तो निर्णय पूर्ण चुकीचा ठरला. टॉस गमावून पहिले फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 बाद 387 धावा केल्या. आता विंडीजला विजयासाठी 388 धावांची गरज आहे. भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी संघाला साजेशी सुरुवात करून दिली. दोंघांनी यादरम्यान शतकंही केली आणि विंडीज गोलंदाजांविरुद्ध पूर्णपणे वर्चस्व राखले. रोहित आणि राहुलने विंडीजविरुद्ध पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक 227 धावांची भागीदारी रचली. यासह रोहित-राहुलची जोडी वेस्ट इंडिजविरुद्ध 200 पेक्षा अधिक धावांची भागीदारी नोंदविणारी पहिली भारतीय जोडी बनली. पहिल्या विकेटसाठी वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्याही भारतीय जोडीने केलेली ही सर्वोच्च भागीदारी आहे. विंडीजकडून शेल्डन कोटरेल याने 2, पोलार्ड, किमो पॉल आणि अलझारी जोसेफ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

यापूर्वी रोहितला सामन्यात जीवदान मिळाले, जेव्हा त्याला रोस्टन चेस याच्या 28 व्या षटकात शिमरोन हेटमायर (Shimron Hetmeyr) याने त्याचा झेल सोडला. राहुलने 102 चेंडूत शतक पूर्ण केले तर रोहितने 107 चेंडूत एकदिवसीय सामन्यात आपले 28 वे शतक पूर्ण केले. रोहितने 107 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. केएल राहुल 104 चेंडूंत 102 धावा करून बाद झाला. राहुल बाद झाल्यावर पहिल्याच चेंडूवर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा खाते न उघडता पॅव्हिलिअनमध्ये परतला. यानंतर रोहितही मोठ्या शॉट खेळण्याच्या प्रयत्नात 159 धावा करुन बाद झाला. रोहितने 138 चेंडूंत 17 चौकार आणि 5 षटकारांसह 159 धावा फटकावल्या.

रोहितनंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी वेगाने फलंदाजी सुरूच ठेवली आणि विंडीज गोलंदाजांची क्लास घेतली. श्रेयस आणि पंतने षटकार लागले आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पंत 16 चेंडूत 39 धावा करून कॅच आऊट झाला. त्यानंतर अय्यरने अर्धशतक पूर्ण केले आणि 32 चेंडूत 53 धावा करून कॅच आऊट झाला. रवींद्र जडेजा 0 आणि केदार जाधव 16 धावांवर नाबाद परतले.