IND vs WI 2nd ODI: रिषभ पंतचा ‘ओपनर’ प्रयोग फसला, फलंदाजाने पुन्हा एकदा भेट दिली विकेट; संघ व्यवस्थापनाच्या विचार प्रक्रियेचा दिग्गजाने केला खुलासा
रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 237 धावा केल्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतला  (Rishabh Pant) सलामीवीर म्हणून मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला पण टीम इंडियाला (Team India) त्याचा फारसा फायदा होऊ शकला नाही. पंतला ‘ओपनर’ म्हणून मैदानात उतरवण्याचा भारतीय संघाचा प्रयोग चांगलाच फसला. पंतला 34 चेंडूत 18 धावा करता आल्या. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजचा प्रभारी कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिल्या तीन विकेट झटपट गमावल्या. डावाच्या तिसऱ्या षटकात केमार रोचने सलामीवीर रोहितला पायचीत केले. यानंतर पंतने माजी कर्णधार विराट कोहलीसोबत डाव पुढे नेला पण ही भागीदारीही फार काळ टिकली नाही. (IND vs WI 2nd ODI: सूर्यकुमार यादवचे शानदार अर्धशतक, भारताचे वेस्ट इंडिजसमोर 238 धावांचे लक्ष्य)

ओडियन स्मिथच्या चेंडूवर खराब फटका खेळून पंतने पॅव्हिलियनची वाट धरली. त्याने 34 चेंडूत 18 धावा करत आपला डाव संपवला. 52.00 च्या स्ट्राईक रेटसह पंतने संथ खेळी खेळली ज्यात 3 चौकारांचा समावेश होता. मालिकेच्या निर्णायक सामन्यात टीम इंडियाच्या या चकित निर्णयावर माजी दिग्गज खेळाडू देखील संतापले. टीम इंडियाचा हा निर्णय माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना आवडला नाही. रिषभ पंतला 5 किंवा 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला आणणे हा योग्य निर्णय असेल, कारण तो सामना पूर्ण करू शकेल, असे गावस्कर म्हणाले. त्यावेळी त्याच्या मते अशी परिस्थिती असते जिथे तो स्वत:नुसार खेळ खेळू शकतो. लक्षात घ्यायचे की पण पंतपूर्वी विंडीजविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात राहुल आणि शिखर धवनच्या अनुपस्थितीत ईशान किशन कर्णधार रोहितसोबत सलामीला उतरला होता.

दुसरीकडे, हा संघ व्यवस्थापनाचा मार्ग असू शकतो ज्यामुळे पंतवर जबाबदारी टाकली जाऊ शकते असेही गावस्कर म्हणाले. संघाला पंतकडून धावांची अपेक्षा असल्याचा हा संदेश स्पष्ट आहे. शिखर धवन संघात नसल्यास सलामीसाठी केएल राहुल हा योग्य पर्याय आहे, असे या माजी क्रिकेटपटूने सांगितले. जेणेकरुन सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर आणि त्यानंतर पंत फलंदाजीला उतरू शकेल. दुसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि रिषभ पंतची जोडी टीम इंडियासाठी सलामीला उतरली. मात्र, यावेळी दोघांची जोडी काही फारसे योगदान देऊ शकली नाही.