IND vs WI 1st T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने (Team India) बॉलनंतर बॅटने जबरदस्त खेळ करून 6 विकेटने शानदार विजय मिळवला आहे. विंडीज संघाने पहिले फलंदाजी करून यजमान संघासमोर 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाला (Indian Team) बॅटने काहीसा संघर्ष करावा लागला, पण चांगल्या सुरुवातीचा फायदा घेत रोहित ब्रिगेडने 18.5 षटकांत 6 गडी राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) 40 आणि ईशान किशनने 35 धावांचे योगदान दिले. तर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 34 धावा आणि व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) नाबाद 24 धावा करून मालिकेतील पहिल्या विजयाचा मान यजमान संघाला मिळवून दिला. दरम्यान विंडीज गोलंदाज विजयासाठी प्रयत्नशील होते, पण अखेरीस त्यांच्या हाती पराभवाची निराशा आली. (IND vs WI 1st T20I: पदार्पण सामन्यात Ravi Bishnoi याचे ‘नकोसे’ कृत्य, झेल घ्यायला गेला आणि दिला ‘षटकार’ Watch Video)
सामन्याच्या सुरुवातीला भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. निकोलस पूरनला वगळता अन्य विंडीज खेळाडू बॅटने अपयशी ठरले. पूरनने सर्वाधिक 61 धावा केल्या. तर अन्य खेळाडूंनी भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध खेळीपुढे गुडघे ठेवले. रवी बिष्णोई आणि हर्षल पटेलने प्रत्येकी दोन विकेट तर युजवेंद्र चहल, दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारने विंडीज संघाला 157/7 धावसंख्येवर रोखले. प्रत्युत्तरात कर्णधार रोहित आणि ईशान किशनच्या सलामी जोडीने 64 धावांची भागीदारी करून संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. यादरम्यान दमदार फलंदाजी करणारा रोहित विंडीजच्या रॉस्टन चेसच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर झेलबाद झाला. रोहितने 19 चेंडूत 40 धावा केल्या.
त्यानंतर किशनने विराट कोहलीच्या साथीने डाव सावरला असताना पहिले ईशान 42 चेंडूत 35 धावांत बाद झाला. किशन बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात कोहलीनेही आपली विकेट गमावली. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत 8 धावा करून स्वस्तात माघारी परतला. पण सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यरने संयमाने फलंदाजी करून संघाला अखेर विजयीरेष ओलांडून दिली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-20 सामना 18 फेब्रुवारी रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावरच खेळला जाईल.