टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SL Pink-Ball Test: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात बेंगलोर येथे दोन सामन्यांच्या मालिकेचा दुसरा व अंतिम सामना खेळला गेला. गुलाबी बॉलने दिवस/रात्र खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेचा 238 धावांनी धुव्वा उडवला आणि टी-20 मालिकेनंतर कसोटीत ही 2-0  असा व्हाईट-वॉश केला. आणि 2-0 अशी मालिका काबीज केली. भारताने ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यर यांच्या वादळी खेळीच्या जोरावर लंकन संघापुढे व्हाईट-वॉश टाळण्यासाठी 447 धावांचे विशाल लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात संघाच्या निराशाजनक फलंदाजीमुळे संघ 208 धावाच करू शकला आणि त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात विजय मिळवून रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) घरच्या मैदानावर सलग 15 वी कसोटी मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. भारताने 2012-13 मध्ये दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडविरुद्ध अखेरची कसोटी मालिका गमावली होती. (ICC WTC 2021-23: टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा; जसप्रीत बुमराह बनला नंबर 1, तर ऋषभ पंत याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना पछाडलं)

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दोन्ही संघातील पहिल्या पिंक-बॉल कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यर याच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 252 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचे वाघ पुन्हा एकदा भारतीय आक्रमक गोलंदाजीपुढे ढेपाळले आणि 109 धावांत गारद झाले. अशा प्रकारे भारताला पहिल्या डावाच्या आधारे 143 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेली टीम इंडियाचा आघाडीचा क्रम पून्हा एकदा प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. या वेळी ऋषभ पंत आणि अय्यर यांनी मोर्चा सांभाळला आणि भारताने आपला दुसरा डाव 9 बाद 303 धावांवर घोषित केला आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी 447 धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने शतकी खेळी करून एकहाती संघर्ष केला तर कुसल मेंडिस याने अर्धशतकी खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरले. भारतासाठी पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेतल्या तर दुसऱ्या डावात त्याने तीन आणि आर अश्विनने चार गडी बाद केले.

यापूर्वी मोहाली येथे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने आधीच जिंकला असून आज टीम इंडियाने विजय मिळवला आणि टी-20 मालिकेनंतर कसोटी मालिकेत देखील एकहाती विजय मिळवून लंकन संघाचा सुपडा साफ केला. विशेष म्हणजे भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचा हा 400 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. अशा परिस्थतीत टीम इंडियाने बंगळुरू येथील दिवस/रात्र कसोटी सामना जिंकून रोहितसाठी हा आणखी संस्मरणीय बनवला.