IND vs SL 3rd T20I: श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान भारतीय संघाने (Indian Team) एकहाती दबदबा कायम ठेवला आणि धर्मशाला (Dharmasala) येथे झालेल्या तिसऱ्या व अंतिम सामन्यात पाहुण्या संघाचा 6 विकेटने दारुण पराभव करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. लंकन संघाने पहिले फलंदाजी करून भारतासमोर 147 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पुन्हा एकदा निर्णायक फलंदाजी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आणि टीम इंडियाच्या (Team India) खिशात सलग 12 वा टी-20 विजय पाडला. इतकंच नाही तर मायदेशात खेळत रोहित शर्माच्या नेतृत्वात आपल्या टी-20 विजयाचा सिलसिला कायम ठेवला आहे. टी-20 विश्वचषकनंतर संघाची सूत्रे हाती घेतल्यापासून भारताने पहिले न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज संघावर यापूर्वी क्लीन स्वीप केला होता. (IND vs SL 3rd T20I: टी-20 मध्ये टीम इंडियाची बादशाहत, ‘हिटमॅन’आर्मीची विश्वविक्रमाला गवसणी; ‘हे’ 2 संघही आहेत जागतिक विक्रम धारक)
या सामन्यात श्रीलंकन संघाचा कर्णधार दसुन शनाकाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण तो संघाच्या अंगी उलटला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे धुरंधर श्रीलंकाई खेळाडूंनी अक्षरशः गुडघे टेकले. आणि परिस्थिती अशी झाली की संघांचे पाच फलंदाज अवघ्या 60 धावांत तंबूत परतले. मात्र संघाची हालत खराब असताना कर्णधार दसुन शनाका पुढे सरसावला आणि त्याने शेवटच्या काही षटकांत जबरदस्त फटकेबाजी करून धावा लुटल्या. कर्णधार शनाकाच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने 20 षटकांत 5 गडी गमावून 146 धावा केल्या. शनाकाने 38 चेंडूत 74 धावांची नाबाद खेळी केली. शनाका आणि चमिका यांनी सहाव्या विकेटसाठी 47 चेंडूत 86 धावांची भागीदारी करून संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली.
प्रत्युत्तरात श्रेयस अय्यरच्या जबरदस्त फलंदाजी भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. श्रेयसने सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतकी पल्ला गाठला आणि श्रीलंकेच्या पदरी पराभवाची निराशा पाडली. श्रेयस वगळता दीपक हुडाने 22 धावा केल्या तर रवींद्र जडेजा 22 धावा करून नाबाद परतला. यासह टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सलग 12 विजय मिळवणारा भारत कसोटी खेळणारा दुसरा तर एकूण तिसरा संघ ठरला आहे. याशिवाय रोहित शर्माच्या नेतृत्वातील हा संघाचा सलग 9 वा विजय ठरला आहे. यानंतर दोन्ही संघ आता दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमनेसामने येतील.