IND vs SL 3rd T20I: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान भारतीय संघाने (Indian Team) निर्विवाद वर्चस्व गाजवले. धर्मशाला येथे झालेल्या मालिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) पाहुण्या लंकन संघावर 6 विकेटने मात केली आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग सर्वाधिक 12 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील भारतीय संघाची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यासह भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तान (Afghanistan) आणि रोमानिया (Romania) संघाच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. हे दोघे संघात देखील टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सलग 12 सामने जिंकण्याचे विश्वविक्रम धारक संघ आहेत. अफगाणिस्तानने 5 फेब्रुवारी, 2018 ते 15 सप्टेंबर, 2019 दरम्यान सलग 12 सामने जिंकले आहेत. तर रोमानिया संघ 17 ऑक्टोबर 2020 ते 5 सप्टेंबर, 2021 पर्यंत अजेय राहिला आहे. (IND vs SL 3rd T20I: ‘रोहितसेने’चा विजयरथ सुसाट! श्रीलंकेवर एकहाती दबदबा राखत भारताने नोंदवला सलग तिसरा T20 क्लीन स्वीप)
टी-20 विश्वचषक 2021 नंतर, भारतीय संघाने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात मायदेशात तीन सामन्यांची तीन टी-20 मालिका खेळली आहे. पहिली मालिका किवी संघाविरुद्ध होती, ज्यात ‘हिटमॅन’ आर्मने चमकदार कामगिरी करत त्यांना क्लीन स्वीप केले आणि विश्वचषकातील पराभवाचा हिशेब चुकता केला. यानंतर दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडिजनेही रोहितच्या पलटनसमोर 3-0 अशा फरकाने पराभव पत्करला. रोहितने टीम इंडियाची कमान हाती घेतल्यापासून भारतीय संघाने घरच्या मैदानावर टी-20 मध्ये सलग 8 दमदार विजय नोंदवले आहेत. पण टीम इंडियाच्या खात्यात शनिवारीच 7 गडी राखून विजय मिळवल्यानंतर घरच्या मैदानावर सलग दहा विजयांची नोंद झाली आहे.
दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या जागतिक विक्रम धारक अन्य दोन संघांबद्दल बोलायचे तर अफगाणिस्तानने 5 फेब्रुवारी 2018 ते 15 सप्टेंबर 2019 या दरम्यान तिन्ही आयर्लंडचा 5 सामन्यात, बांगलादेशचा 4 सामन्यात आणि झिम्बाब्वेचा 3 सामन्यात पराभव केला. तर रोमानियाने 17 ऑक्टोबर 2020 ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत बल्गेरियाचा 4 वेळा, सर्बियाने 2 वेळा, ग्रीस, चेक-रिपब्लिक, माल्टा, हंगेरी, लक्झेंबर्गचा प्रत्येकी 1-1 असा पराभव केला आणि सलग 12 सामन्यांत विश्वविक्रम आपल्या नावे केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अशी कमाल दिग्गज टी-20 संघाना करणे देखील कठीण झाले आहे.