IND vs SL 2021: कोलंबोच्या (Colombo) आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळला गेला. भारताचा निम्मा संघ 36 धावांच्या आत पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. या सामन्यात खराब फलंदाजीने टीम इंडियाने (Team India) एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे. टीम इंडिया पहिल्या 10 ओव्हरमध्ये फक्त 39 धावाच करू शकली. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 10 ओव्हरमधील ही भारताची सर्वात कमी धावसंख्या आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण ते चुकीचा असल्याचे सिद्ध झाले. कर्णधार शिखर धवन डावाच्या चौथ्या चेंडूवर खाते न उघडता धनंजय डी सिल्व्हाच्या हाती झेलबाद झाला. (IND vs SL T20I 2021: श्रीलंका संघाने रचला इतिहास, शिखर धवनच्या युवा संघाचा पराभव करत भारताविरुद्ध पहिल्यांदाच केली अशी कमाल)
भारताला दुसरा धक्का देवदत्त पडिक्कलच्या रूपात मिळाला जो धावबाद झाला. संजू सॅमसन हसरंगाच्या चेंडूवर बाद झाला. यानंतर पाचव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर हसरंगाने रुतुराज गायकवाडला माघारी धाडलं आणि अखेर भारतीय संघाला पाचवा धक्का नितीश राणाच्या रूपात बसला जो 15 चेंडूत 6 धाव करून दसून शनाकाकडे झेलबाद झाला. अशाप्रकारे धवन ब्रिगेडने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिल्या 10 ओव्हरमध्ये आपल्या सर्वात कमी धावसंख्येची नोंद केली. अर्ध्या टप्प्यात भारताने पाच गडी गमावून 39 धावा केल्या. यापूर्वी 2016 टी-20 वर्ल्ड कप सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध नागपूर येथे पहिल्या 10 ओव्हरमध्ये दुसऱ्या सर्वात कमी 79 धावा केल्या होत्या.
तसेच कोलंबोच्या आर.प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या व अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजी क्रम आठ विकेट्स गमावून 81 धावांचा पल्ला सर करू शकली. यापूर्वी फेब्रुवारी 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाने 17.3 ओव्हरमध्ये आपल्या सर्वात कमी 74 धावांची नोंद केली होती. दरम्यान, भारतासाठी या सामन्यात संदीप वॉरियरने टी-20 मध्ये पदार्पण केले. नवदीप सैनी दुखापतीमुळे संघात सामील होऊ शकला नाही. या सामन्यात टीम इंडियाने दिलेल्या माफक 82 धावांचे लक्ष्य यजमान श्रीलंकेने 3 विकेट्स गमावून गाठले. दुसरीकडे, भारतीय संघातील तब्बल 8 खेळाडूंना कोविड-19 पॉझिटिव्ह कृणाल पांड्याच्या संपर्कात आल्यामुळे आयसोलेट करण्यात आले होते. ज्यामुळे उपस्थित अननुभवी खेळाडूंसह त्यांना उर्वरित दोन्ही सामने खेळण्यास भाग पाडले.