IND vs SL Series 2021: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) 13 जुलैपासून सुरु होणाऱ्या टी-20 आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियाने (Team India) कंबर कसली आहे. भारताचा अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्याकडे पहिल्यांदा संघाच्या नेतृत्वात जबाबदारी सोपवण्यात आली आहे. श्रीलंका दौर्यावर (Sri Lanka Tour) युवा भारतीय संघाचे (Indian Team) नेतृत्व करणाऱ्या धवनला विशेष कारनामा करण्याची मोठी संधी आहे. श्रीलंका दौर्यावर 23 धावा केल्याबरोबर धवन एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी 6000 धावा करणारा 10 वा खेळाडू बनू शकतो. धवनने सध्या वनडे क्रिकेटमध्ये 5977 धावा केल्या आहेत. धवनशिवाय सचिन तेंडुलकर, विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहली, सौरव गांगुली, राहुल द्रविड, महेंद्र सिंह धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, रोहित शर्मा, युवराज सिंह आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हा मैलाचा दगड गाठला आहे. (India vs Sri Lanka: क्वारंटाईन पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघाची मौज-मस्ती; पहा त्यांच्या Fun Activities चा व्हिडीओ)
श्रीलंका दौर्यावर यजमान संघाविरुद्ध भारतीय संघाला अनुक्रमे तीन सामन्यांची वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. 13 जुलैपासून वनडे मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होईल. या मालिकेचा पहिला, दुसरा व तिसरा सामना अनुक्रमे 13 जुलै, 16 जुलै आणि 18 जुलै रोजी राजधानी कोलंबोस्थित आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळली जाईल. एकदिवसीय मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. या मालिकेचा पहिला सामना 21 जुलै, दुसरा 23 जुलै आणि तिसरा व शेवटचा 25 जुलै रोजी खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजल्यापासून आर. प्रेमदासा स्टेडियमवर हे सामने खेळले जाणार आहेत. श्रीलंका दौरा अनेक मोठ्या खेळाडूंसाठी महत्वाची ठरणार आहे. यामध्ये शिखर धवनचाही समावेश आहे. धवन संघाचा अनुभवी खेळाडू आहे आणि नियमित ओपनर रोहित शर्माच्या साथीने त्याने अनेकदा संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. संघात सलामी फलंदाजाच्या जागेसाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर व नंतर इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेत धवनच्या जागी वनडे मालिकेत रोहितसोबत सलामीसाठी केएल राहुलला संधी दिली होती.
दुसरीकडे, बीसीसीआय यदांचा टी-20 वर्ल्ड कप युएई आणि ओमान येथे आयोजित करणार आहे. भारतात सध्याची आणि भविष्यात वाढणारा धोका लक्षात घेता बीसीसीआयने स्पर्धा परदेशात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आयसीसीच्या या स्पर्धेपूर्वी भारतीय बोर्ड युएई येथेच आयपीएल 2021 च्या स्थगित झालेल्या 31 सामन्यांचे देखील आयोजन करणार आहे.