IND vs SL 1st T20I: वर्षाच्या पहिल्या सामन्यात पावसाची बॅटिंग, भारत-श्रीलंकामधील पहिला टी-20 सामना रद्द
प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credits: BCCI/Twitter)

भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघातील पहिला टी-20 सामना एकही बॉल न टाकता रद्द करण्यात आला आहे. गुवाहाटी (Guwahati) मधील हा सामना पाऊस आणि खराब खेळपट्टीमुळे सामना रद्द करावा लागला. नाणेफेक झाल्यानंतर गुवाहाटीमध्ये पावसाला सुरुवात झाली. मध्ये पाऊस थांबला, पण पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला, ज्यामुळे सामना रद्द होण्याच्या मार्गावर आला. परंतु नंतर पुन्हा पाऊस थांबला आणि कमीतकमी 5-5 षटकांपर्यंत सामान होण्याची अपेक्षा होती. मात्र, वेळेच्या अभावी सामना रद्द करण्यात आला. आता दोन्ही संघात दुसरा टी-20 सामना 7 जानेवारीला इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळला जाईल. गुवाहाटीच्या खेळपट्टीवर काही ठिकाणी पाणी होते, ज्याला व्हॅक्यूम क्लिनर, इस्त्री आणि हेअर ड्रायरच्या साहाय्याने वळवण्याचा प्रयत्न केला, पण ग्राउंड्स मेनना अपयश आले आणि अखेरीस सामना रद्द झाला.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु नाणेफेकानंतर काही काळानंतर पावसाने मैदाना हजेरी लावली. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता श्रीलंकेच्या संघाला फलंदाजीसाठी यायचे होते, परंतु सामना निर्धारित वेळेत सुरू होऊ शकला नाही. मात्र, सायंकाळी 7.50 वाजता पाऊस थांबला आणि अंपायर मैदानावर खेळपट्टीचा पाहणी करण्यासाठी आले. अम्पायर्सने ग्राउंड स्टाफशी बोलून खेळपट्टीची पाहणी केली, पण खेळपट्टीवर पाणी आढळले. खेळपट्टीवरून पाणी काढताना निष्काळजीपणा पाहायला मिळाला. खेळपट्टीवरुन कव्हर्स काढताना पाणी पिचवर पडले, ज्याला नंतर सुखावण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळेत यश मिळाले नाही.

दरम्यान, या मॅचमध्ये अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याच्यासह वर्ष 2020 च्या पहिल्या सामन्यात कोहलीने 4 वेगवान गोलंदाजांना संधी दिली. शिवमशिवाय जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी यांचा संघात समावेश आहे.