IND vs SL 1st ODI: टीम इंडियाची विजयी सलामी, शिखर धवन-ईशान किशनचा अर्धशतकी धमाका; श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव
शिखर धवन आणि ईशान किशन (Photo Credit: PTI)

IND vs SL 1st ODI 2021: कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि युवा फलंदाज ईशान किशनच्या (Ishan Kishan) अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने (India) कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी सलामी देत 36.4 ओव्हरमध्ये यजमान श्रीलंकेचा (Sri Lanka) 7 विकेट्सने पराभव केला. भारताच्या विजयात धवन आणि किशनने समवेत खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली. सूर्यकुमार यादव 31 धावा करून नाबाद परतला. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात धवनने 86 धावांची नाबाद खेळी केली तर किशनने 59 धावा केल्या. मनीष पांडेने 26 धावा तर पृथ्वी शॉ याने तुफानी 43 धावांचे योगदान दिले. या विजयासाठी टीम इंडियाने (Team India) तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, यजमान श्रीलंकेसाठी धनंजय डी सिल्वाला 2 तर लक्षण संदकनने 1 विकेट काढली. (IND vs SL 1st ODI 2021: शिखर धवनची पहिल्या सामन्यात केली कमाल, श्रीलंकेविरुद्ध संयमी खेळीने एकसाथ केला दोन मोठा कारनामा)

पहिले फलंदाजी करून श्रीलंकेने दिलेल्या 263 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारताकडून पृथ्वी शॉने धवनच्या जोडीला आक्रमक सुरुवात करून दिली. शॉने श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई सुरु केली तर धवनने बॅकफूटवर राहून पृथ्वीला खेळण्याची संधी दिली. दोघांमध्ये 58 धावांची अर्धशतकी भागीदारी झाली असताना धनंजय डि सिल्वाने शॉला माघारी धाडलं. पृथ्वीने 9 चौकारांच्या सहाय्याने 23 चेंडूत 43 धावा फटकावल्या. यांनतर धवनने पदार्पणवीर ईशान किशनला साथ देत फटकेबाजी सुरु केली. दोघांनी संघाची धावसंख्या शंभरी पार नेली. यादरम्यान किशनने पदार्पणाच्या वनडे सामन्यात 33 चेंडूत अर्धशतक झळकावले. मात्र, तो मोठी खेळी करू शकला नाही आणि डी सिल्वाने त्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. किशननंतर धवनने देखील 63 चेंडूत 50 धावा ठोकल्या. 31व्या षटकात डी सिल्वाने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या मनीष पांडेला दसून शनाकाकडे झेलबाद केले.

दरम्यान, सुरुवातीपासून भारतीय गोलंदाजानी सामन्यावर पकड मिळवली होती. पण, शेवटच्या ओव्हरमध्ये 19 धावा कुटत श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 263 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून दीपक चाहर, कुलदीप यादव आणि यजुर्वेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तसेच कृणाल आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.