केएल राहुल (Photo Credit: PTI)

IND vs SA ODI 2022 Series: विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) कसोटी मालिका गमावल्यावर टेस्ट क्रिकेटमधून नेतृत्व पदाचा राजीनामा जाहीर केला. यानंतर भारतीय टेस्ट संघाचा (Indian Test Team) पुढील कर्णधार कोण असेल याबाबत चर्चा सुरु झाली आहे. रोहित शर्माचे (Rohit Sharma) नाव आघाडीवर असले तरी केएल राहुल (KL Rahul) आणि जसप्रीत बुमराह यांच्यासारखे खेळाडू शर्यतीत सामील आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 19 जानेवारी रोजी पहिल्या वनडे सामन्यापूर्वी प्रभारी कर्णधार राहुलला याबाबत विचारले असता म्हणाला की भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद मिळणे हा एक मोठा ‘सन्मान’ असेल, परंतु सध्या तो आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेवर लक्ष केंद्रित करत आहे. उल्लेखनीय म्हणजे, जोहान्सबर्ग कसोटीत कोहलीच्या दुखापतीमुळे राहुलने कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केले. याशिवाय एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनचे चित्रही स्पष्ट केले. (IND vs SA 1st ODI 2022: पहिल्या वनडेसाठी Wasim Jaffer ने भारतीय XI चा वर्तवला अंदाज, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दोन सरप्राईज खेळाडूंची केली निवड)

“मला जोहान्सबर्गमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि मला नेहमीच अभिमान वाटेल. होय, मला पूर्णवेळ कसोटी कर्णधार बनवले गेले तर हा खूप मोठा सन्मान असेल. पण मी आत्ता विचार करत आहे असे काही नाही. सध्या एकदिवसीय मालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे,” राहुलने मालिकेपूर्वी व्हर्च्युअल प्रेसरमध्ये पत्रकारांना सांगितले. केपटाऊन येथील तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोहलीने कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा दिला. त्याने भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून कारकीर्द संपुष्टात आणली. विराटने कसोटीत संघाचे नेतृत्व केलेल्या विक्रमी 68 कसोटींमध्ये 40 जिंकले आणि 17 गमावले आहेत. दुसरीकडे, पहिल्या वनडे सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनचे चित्र स्पष्ट करत राहुल म्हणाला की एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत तो भारतासाठी फलंदाजीची सुरुवात करेल.

राहुल पत्रकारांना म्हणाला, “गेल्या 14-15 महिन्यांत मी 4, 5 वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, जिथे संघाला माझी गरज होती. रोहित येथे नसल्यामुळे मी आघाडीला फलंदाजी करेन.” तसेच अष्टपैलू व्यंकटेश अय्यर एकदिवसीय पदार्पण करणार अशी राहुलने कल्पना दिली. व्यंकटेश अय्यरने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण केले होते. याशिवाय बोलंड पार्क खेळपट्टी फिकीपटूंना साथ देत असल्याने रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्वपूर्ण असतील असे राहुल म्हणाला. अश्विनने 2017 मध्ये अंतिम सामना खेळला होता.