IND vs  SA 3rd Test: दक्षिण आफ्रिका संघ एक डाव आणि 202 धावांनी पराभूत, 3-0 क्लीन-स्वीप करत टीम इंडियाने मिळवला ऐतिहासिक विजय
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: IANS)

रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये तिसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार खेळी करत दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध टीम इंडियाच्या (India) 3-0 क्लीन-स्वीपमध्ये महत्वाचे योगदान दिले. भारताने चौथ्या दिवशी आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी पराभव केला. उल्लेखनीय म्हणजे आफ्रिकाविरुद्ध मालिकेतील विजय भारताचा घरच्या मैदानावरील सलग 11 वा विजय आहे. भारताकडून दुसर्‍या डावात मोहम्मद शमी (Mohammed Shami) ने 3 विकेट्स, उमेश यादव आणि शाहबाझ नदीम (Shahbaz Nadeem) यांनी दोन गडी बाद केले आहेत. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या प्रत्येकी एक विकेट आहे. आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मालिकेत विजय मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला. यापूर्वी भारताने आफ्रिकेवर क्लीन-स्वीप मिळवला नव्हता. दरम्यान, आफ्रिकाकडून थेयूनिस डी ब्रुयन याने सर्वाधिक धावा केल्या. भारतविरुद्ध तिसऱ्या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेसाठी टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या जॉर्ज लिंडे 27 धावा करून धाव बाद झाला. पहिल्या दोन्ही टेस्टप्रमाणे टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम टेस्टमधेही वर्चस्व राखून ठेवले होते. फलंदाजीनंतर गोलंदाजांनी संघासाठी महत्वाची भूमिका बजावली. (BCCI ने शेअर केला विराट कोहली याचा सिंघम स्टाईल फोटो, सोशल मीडिया यूजर्सनी शेअर केल्या हटके Memes, पहा Tweets)

भारताने पहिला डाव 497 धावांवर घोषित केल्यावर आफ्रिकेचे फलंदाज पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यात अपयशी राहिले. आणि एका मागोमाग एक फलंदाज बाद होण्याचे सत्र सुरूच राहिले. यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव सोमवारी केवळ 162 धावांवर संपुष्टात आला. यानंतर भारताने त्यांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेची स्थिती बदलू शकली नाही आणि संघ एकामागोमाग एकविकेट गमावत राहिला. या मॅचमध्ये विजय मिळवत भारताने टेस्ट चॅम्पियनशिपच्या त्यांच्या गुणांमध्ये अजून 40 पॉईंट्सची भर पडली आहे आणि 240 गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आहे. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाच्या पहिल्या स्थानामागे 60 गुणांसह न्यूझीलंड आणि श्रीलंका संघ आहे. या विजयसह पॉईंट्समध्ये 40 गुणांची भर घालत भारताने त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी न्यूझीलंड आणि श्रीलंका संघावर 180 गुणांची आघाडी घेतली आहे.

वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करून संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दुसरीकडे, आफ्रिकानंतर भारतीय संघ आता बांग्लादेशविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 आणि 2 मॅचची टेस्ट मालिका खेळणार आहे.