IND vs SA 3rd Test 2022: ‘बर्थडे बॉय’ राहुल द्रविडच्या Virat Kohli ठरला वरचढ, ‘ही’ कमाल करणारा बनला भारताचा नंबर 2 फलंदाज
राहुल द्रविड आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs SA 3rd Test Day 1: आणखी एक दिवस आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) आणखी एक विक्रम. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केप टाउन (Cape Town) येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 10 पेक्षा अधिक धावा करताच भारताचा नियमित कसोटी कर्णधार आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मागे दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू आहे. कोहलीने या आफ्रिकी राष्ट्रात 624 धावा करणाऱ्या राहुल द्रविडला (Rahul Dravid) मागे टाकले. आज 49 वा वाढदिवस साजरा करत असलेल्या द्रविडने दक्षिण आफ्रिकेत 11 कसोटी सामने खेळले होते. कोहलीला त्याच्या मुख्य प्रशिक्षकाचा विक्रम मागे टाकण्यासाठी केप टाउनमध्ये फक्त 14 धावा करायच्या होत्या आणि 33 वर्षीय कोहलीला पहिल्या सत्रातच हा टप्पा गाठला. (IND vs SA 3rd Test Day 1: लंचपर्यंत भारताच्या 2 बाद 75 धावा, विराट कोहली-चेतेश्वर पुजाराने सांभाळला मोर्चा)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा भारतासाठी दक्षिण आफ्रिकेतील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, त्याने 15 कसोटी सामन्यांमध्ये 46.44 च्या प्रभावी सरासरीने तब्बल 1161 धावा केल्या आहेत. सचिनच्या या विक्रमी पराक्रमात तीन शतके आणि दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. दरम्यान आजपासून सुरु झालेल्या सामना विराट कोहलीचा 99 वा कसोटी सामना आहे आणि टीम इंडिया केप टाउनमध्ये पहिल्या विजयासह दक्षिण आफ्रिकेत प्रथम मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. केप टाउन कसोटीबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात भारताने 2 बाद 75 धावा केल्या. भारताचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि मयंक फारसा प्रभाव पाडू शकले नाही. अशा परिस्थितीत विराट आपला 99 वा कसोटी सामना संस्मरणीय बनवेल आणि मोठी खेळी खेळेल अशी चाहत्यांना आशा आहे.

दरम्यान सेंच्युरियन कसोटी सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला तर दुसऱ्या जोहान्सबर्गच्या वांडरर्सवर यजमान संघाने बाजी मारली. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात कोणता संघ विजयी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. तिसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुखापतग्रस्त मोहम्मद सिराजच्या जागी उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे, तर हनुमा विहारीच्या जागी कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला आहे.