IND vs SA 3rd ODI 2022: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना डी कॉकच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा संघ 49.5 षटकांत 287 धावा करत सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने 49.2 षटकात 283 धावा केल्या आणि सामना 4 धावांनी गमावला. दक्षिण आफ्रिकेने तीनही सामने जिंकून भारताचा सफाया केला आणि एकदिवसीय मालिका 3-0 अशी जिंकली. न्यूलँड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात बॅट आणि बॉलचा आक्रमक खेळ पाहायला मिळाला. या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काही प्रमुख रेकॉर्डस्नाही गवसणी घातली जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs SA 3rd ODI: केपटाऊन वनडेत दक्षिण आफ्रिकेचा विश्वविक्रमी विजय, टीम इंडियाचा क्लीन स्वीप करून पाकिस्तानच्या रेकॉर्डची केली बरोबरी)
1. भारतीय संघाचा माजी एकदिवसीय कर्णधार विराट कोहलीने केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 84 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकारांसह 65 धावा केल्या. या सामन्यात त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 191 वेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी खेळली आणि महेला जयवर्धनेला मागे टाकले. महेलाने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 190 वेळा 50 पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.
2. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन वनडे सामन्यातील विराट कोहलीने कारकिर्दीतील 64 वे आणि मालिकेतील दुसरे अर्धशक ठरले.
3. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि सध्याचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने केपटाऊनमध्ये खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतील अंतिम सामन्यात भारताविरुद्ध दमदार शतक झळकावले. डी कॉकने 108 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांसह आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 17 वे शतक झळकावले.
4. दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर क्विंटन डी कॉकचे केपटाऊन वनडे सामन्यातील हे शतक भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील सहावे ठरले आहे. डी कॉकची ही भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील 16वी खेळी होती.
5. डी कॉक भारताविरुद्ध 6 एकदिवसीय शतके झळकावणारा जगातील दुसरा संयुक्त खेळाडू ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6 शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि श्रीलंका संघाचा माजी कर्णधार कुमार संगकारा यांनीही भारताविरुद्ध 6-6 शतके झळकावली आहेत.
6. क्विंटन डी कॉक हा देशाविरुद्ध सर्वात कमी डावात 6 एकदिवसीय शतके झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. डी कॉकने 16 डावांमध्ये हा पराक्रम केला आहे, तर भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवागने न्यूझीलंडविरुद्ध 23 डावांमध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 शतके झळकावली आहेत.