IND vs SA 2nd Test Day 4: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वांडरर्स स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रभारी कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघाला (Indian Team) पराभवाचे तोंड पाहायला लागले आहे. नाणेफेक जिंकून भारताने विजयासाठी यजमान संघासमोर दोन दिवस शिल्लक असताना विजयासाठी 240 धावांचे आव्हान दिले होते. Proteas कर्णधार डीन एल्गरने (Dean Elgar) बॅटने पुढाकाराने नेतृत्वात करून या मैदानात टीम इंडियाला (Team India) पहिल्या पराभवाची धूळ चारली. इतकंच नाही तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (South Africa Tour) पहिल्या-वाहिल्या कसोटी मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची विजयाची प्रतीक्षा आणखी वाढवली आहे. वांडरर्सवर विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारतीय खेळाडूंच्या अपयशी कामगिरीमुळे संघाने कसोटी विजयाची संधी गमावली आहे. (IND vs SA 2nd Test Day 4: जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेने रोखला टीम इंडियाचा विजयरथ; Wanderers वर भारताचा 7 गडी राखून पराभव)
रिषभ पंत (Rishabh Pant)
जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात बेजबाबदार शॉट खेळण्यासाठी युवा विकेटकीपर चाहते आणि जाणकारांच्या निशाण्यावर आला आहे. दोन्ही डावात संघ अडचणीत असताना पंत बॅटने योगदान देण्यात अपयशी ठरला. पहिल्या डावात तो 17 धावाच करू शकला तर दुसऱ्या डावात तो भोपळाही फोडू शकला नाही. यामुळे पहिल्या डावात संघ मोठी धावसंख्या गाठू शकला नाही.
मधल्या फळीचे अपयश
पंतसह भारताची मधली फळी देखील संघाच्या पराभवाचे मुख्य कारण ठरली. पंत वगळता पहिल्या डावात अन्य फलंदाज देखील योगदान देऊ शकले नाही. अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी बॅटने फ्लॉप ठरले. ज्याचा पहिल्या डावात संघाला मोठा फटका बसला. याशिवाय दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारासह दोघांनी नाममात्र योगदान दिले असले तरी ते संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेण्यात अपयशी ठरली. विशेषतः विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताच्या मधल्या फळीवर मोठी जबाबदारी होती. आणि ते अपेक्षापूर्ती करू शकले नाही.
सलामी जोडीचा फ्लॉप-शो
केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवालने सेंच्युरियन कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात संघाला शानदार सुरुवात करून दिली होती. ज्याचा फायदा देत संघाने मोठी धावसंख्या गाठली. पण दोघे वांडरर्स कसोटीत दोघे आपली लय कायम ठेवण्यात फ्लॉप ठरले. यामुळे संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही आणि अन्य खेळाडूंवरील दबाव वाढला.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)
भारताचा स्टार आणि घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुसऱ्या डावात एकही विकेट मिळाली नाही. भारतीय गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करणारा बुमराह दुसऱ्या डावात विकेट घेण्यात अपयशी ठरला. त्यांनी दक्षिण आफ्रिकी कर्णधार डीन एल्गरला शॉर्ट-बॉलने नक्कीच त्रास दिला पण एकही गडी बाद करू शकला नाही. बुमराहने विकेट घेणे गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्वाचे आहे पण दुसऱ्या डावात तो असे करू न शकल्याने अन्य गोलंदाज देखील बॉलने प्रभाव पाडू शकले नाही. आणि भारताला पहिल्यांदा वांडरर्सवर पहिल्या पराभवाचे तोंड पाहायला लागले.