यजमान भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध दुसरा टेस्ट सामना कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी संस्मरणीय ठरला आहे. या सामन्यादरम्यान विराटने रॉस टेलर याच्यासह माजी भारतीय दिग्गज खेळाडू यांच्यापेक्षा सर्वाधिक धावा केल्या आहेत. यामध्ये न्यूझीलंडचा रॉस टेलर, इंग्लंडचा केन बॅरिंग्टन आणि भारताचे दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांचा समावेश आहे. वेंगसरकर यांनी टेस्ट करिअर मध्ये 6868 धावा केल्या आहेत. आणि विराटने आजवर 6869 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यापूर्वी विराटने 80 कसोटी सामने खेळले आहेत. दुसरीकडे, रॉस टेलरने आतापर्यंत 94 कसोटी सामन्यांमध्ये 6839 धावा केल्या आहेत. या सामन्यात कोहली फलंदाजीसाठी आला तेव्हा तो वेंगसरकरच्या 68 धावांनी मागे होता. तो सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी चांगली फलंदाजी करीत होता. (IND vs SA 2nd Test Day 1: मयंक अग्रवाल याचे सलग दुसरे शतक, केली 'या' विक्रमांची नोंद)
कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च धावांच्या बाबतीत विराट वेंगसरकरला मागे टाकेल असे वाटत असतानाच कमी रोषणाईमुळे खेळ थांबविला. यावेळी कोहली 63 धावांवर नाबाद परतला. 'कर्नल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेंगसरकर यांनी 116 कसोटीत 6868 धावा केल्या आहेत. वेंगसरकर यांनी 1976 ते 1992 दरम्यान खेळलेल्या कसोटी सामन्यांमध्ये 17 शतके ठोकली होती. त्याची सरासरी 42.13 धावा आहे. विराटने त्याच्या कसोटी कारकीर्दीत 25 शतके आणि 23 अर्धशतके ठोकली आहेत. एकूण विक्रमाबद्दल सांगायचे झाले तर सचिन तेंडुलकर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 200 कसोटी सामन्यात 15921 धावा केल्या आहेत. या यादीमध्ये विराट कोहलीही पहिल्या 50 क्रिकेटपटूंनमध्येही नाही. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो 53 व्या क्रमांकावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 50 व्या क्रमांकावर आहे. भारतीय फलंदाजांविषयी बोलले तर, कोहली आता सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सातव्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली यांनी त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
दरम्यान, विराट टेस्ट कारकिर्दीतील २६ व्या टेस्ट शतकाच्या जवळ पोहचला आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे झालेल्या टेस्ट मॅचमध्ये कोहलीने कसोटीतील शेवटचे शतक झळकावले होते. त्यावेळी कोहलीने पर्थमध्ये 123 धावा केल्या होत्या. आणि तेव्हापासून त्याच्या चाहत्यांना कसोटीत शतकाची वाट पाहायला लागली.