IND vs SA 2nd Test Day 2: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील जोहान्सबर्गच्या (Johannesburg) वांडरर्स स्टेडियमवरील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाच्या अंतिम सत्रात दक्षिण आफ्रिकेला 229 धावांत गुंडाळून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने (Team India) दिवसाखेर दुसऱ्या डावात 2 बाद 85 धावा केल्या आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारत 58 धावांनी आघाडीवर होता. भारताने सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवालची विकेट गमावली असून आता तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांच्यावर चांगली सुरुवात करून संघाला मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी असेल. सध्या पुजारा 35 धावा आणि रहाणे 11 धावा करून नाबाद खेळत आहेत. दुसरीकडे मार्को जॅन्सन आणि डुआन ऑलिवरने यजमान संघासाठी आतापर्यंत प्रत्येकी एक विकेट घेतल्या आहेत. (IND vs SA: तिसऱ्या कसोटीत विराट कोहली ‘या’ फलंदाजाला करणार रिप्लेस; संघर्ष करणाऱ्या रहाणे-पुजाराच्या भविष्यावर भारतीय यष्टीरक्षकाने वर्तवले भाकीत)
यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीला भारतीय संघाच्या पहिल्या डावातील 202 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान संघाने 35/1 धावसंख्येपासून पुढे खेळत 229 धावा केल्या आणि भारतावर 27 धावांची नाममात्र आघाडी घेतली. भारताकडून शार्दुल ठाकूरने 61 धावांत 7 विकेट घेतल्या. तर यजमानांसाठी कीगन पीटरसनने 62 आणि टेंबा बावुमाने 51 धावांचे योगदान दिले. अंतिम क्षणी जॅन्सन आणि केशव महाराज यांच्या 21 धावांचं झटपट खेळी केली. यानंतर केएल राहुल आणि मयंक अग्रवालच्या सलामी जोडीने दुसऱ्या डावाची सुरुवात केली. पण दुसऱ्या डावात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाचा कर्णधार राहुलने अवघ्या 8 धावांवर जॅन्सनच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली. राहुलने सलामीवीर मयंक अग्रवालने 23 धावांची खेळी खेळली आणि ऑलिवरच्या चेंडूवर पायचीत बाद झाला. भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यावर पुजारा आणि रहाणेने मोर्चा सांभाळत धावफलक हालत ठेवला.
या सामन्यात भारताचा प्रभारी कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. राहुलने 50 धावा केल्या तर रविचंद्रन अश्विनने 46 धावांचे योगदान दिले. राहुल वगळता अन्य फलंदाज मोठी खेळी करू शकले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात मार्को जॅन्सनने चार, तर कगिसो रबाडा आणि ऑलिवरने प्रत्येकी तीन गडी बाद केले.