IND vs SA 1st Test: लुंगीने वाजवली पुजाराची पुंगी! Cheteshwar Pujara याला दोनदा गोल्डन डकवर बाद करणारा दक्षिण आफ्रिकी एकमेव खेळाडू
चेतेश्वर पुजारा (Photo Credit-PTI)

IND vs SA 1st Test Day 1: भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचा (Cheteshwar Puajra) खराब फॉर्म रविवारीही कायम राहिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) तीन सामन्याच्या मालिकेतील सुपरस्पोर्ट पार्क येथे सामन्याच्या पहिल्याच दिवशी सेंच्युरियन कसोटीत  (Centurion Test) पहिल्या चेंडूवर बाद झाला. विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्या सत्रात लुंगी एनगिडीच्या (Lungi Ngidi) 9 व्या षटकात शॉर्ट लेगवर कीगन पीटरसनच्या हाती पुजारा झेलबाद झाला. यामुळे टीम इंडियाची (Team India) 2 बाद 117 अशी स्थिती झाली. विशेष म्हणजे पुजाराला कसोटी क्रिकेटमध्ये गोल्डन डकवर आऊट होण्याची ही दुसरी घटना होती आणि दोन्ही वेळा तो लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. अग्रवालने एनगिडीच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी शानदार 60 धावांची खेळी केली. (IND vs SA 1st Test Day 1: दोन मोठ्या विकेट्ससह दक्षिण आफ्रिकेचे पुनरागमन, Tea पर्यंत भारताची धावसंख्या 157/2)

पण, 41व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो एनगिडीचा बळी ठरला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर एनगिडीने आणखी एक विकेट घेतली आणि भारताला अडचणीत आणले. मयंक बाद झाल्यावर फलंदाजीला आलेला पुजारा खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतला. लुंगीचा हा चेंडू चौथ्या स्टंपवर होता जो पुजाराने डिफेंड करण्याचा निर्णय घेतला. तथापि पुजाराला तसे करता आले नाही आणि बॅटची आतील बाजू घेत चेंडू थाय पॅडवर आदळला आणि शॉर्ट लेगच्या दिशेने उसळला. तिथे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने चपळाई दाखवत झेल घेतला. तर यापूर्वी एनगिडीने पुजाराला बाद करण्याची पद्धत त्याच ठिकाणी खेळल्या गेलेल्या 2018 मालिकेतील दुसऱ्या कसोटीत खूपच वेगळी होती. एनगिडीने पुजाराला नॉन-स्ट्रायकरला धावबाद केले होते.

दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी पाहुण्या संघाला दमदार सुरुवात करून देत बिनबाद 117 धावा केल्या होत्या. मयंकने दुसऱ्या सत्रात आपले सहावे कसोटी अर्धशतक झळकावले आणि एनगिडीने त्याला पायचीत केले. दोघांपैकी मयंक अधिक आक्रमक होता पण त्याला राहुलने चांगली साथ दिली आणि त्यांनी संथ खेळपट्टीचा फायदा घेतला. दुसरीकडे, जूनपासून पहिली कसोटी खेळत असलेल्या दक्षिण आफ्रिकेला दडपण निर्माण करता आले नाही.