IND vs SA 1st Test Day 5: रविचंद्रन अश्विन याचा कमाल; मुथय्या मुरलीधरन ची बरोबरी करत बनवला सर्वात जलद 350 टेस्ट विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Getty)

तब्बल 10 महिन्यांनंतर टीम इंडियाच्या टेस्ट संघात प्रवेश करणारा रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याने दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात एक विश्वविक्रम बनवला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम कसोटी सामन्यात त्याने चांगली सुरुवात केली. भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केल्यावर, तिसऱ्या दिवशी अश्विनने 5 विकेट घेत आफ्रिका संघाच्या मुश्किलीत वाढ केली. पाचव्या दिवशी अश्विनने थेउनिस डी ब्रुयन (Theunis de Bruyn) याची विकेट घेत वर्ल्ड रेकॉर्ड बनवून टाकला. 33 वर्षीय अश्विनने 66 व्या टेस्ट सामन्यात हा पराक्रम केला आहे. शिवाय, अश्विन हा भारताकडून सर्वात जलद 350 कसोटी विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 350 आंतरराष्ट्रीय कसोटी विकेट्स मिळवण्याचा पराक्रम श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralithara) यांच्या नावावर आहे. आणि आता अश्विनने मुरलीधरनची या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बरोबरी केली आहे आणि या यादीमध्ये संयुक्तपणे प्रथम स्थान मिळवले आहे. (IND vs SA 1st Test Day 5 Live Score Updates: दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का, डी ब्रुयनसह टेंबा बावुमा स्वस्तात बाद )

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाच्या अंतिम सत्रात अश्विनने पहिले दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी अश्विनने 3 गडी बाद केले आणि चौथ्या दिवशी दोन विकेट्स आणि पाचव्या दिवशी याची विकेट घेत 350 टेस्ट विकेटचा टप्पा गाठला. यादरम्यान, अश्विनने माजी भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) यांना देखील मागे टाकले. कुंबळेने 77 व्या मॅचमध्ये 350 विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय, कसोटीत सर्वात वेगवान 250 आणि 300 विकेट्स घेण्याचा विक्रमही अश्विनच्या नावावर आहे.

अश्विनची दक्षिण आफ्रिकाविरुद्धची कामगिरी उत्कृष्ट आहे. या सामन्याआधी त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारतात पाच कसोटी सामने खेळले होते. अश्विनने या सामन्यांमध्ये 33 गडी बाद केले आहेत. म्हणजेच त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारतातील प्रत्येक सामन्यात सरासरीपेक्षा सहा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.