भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाले की भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील द्विपक्षीय मालिका पुनर्संचयित करणे हे संबंधित सरकारांवर अवलंबून आहे, क्रिकेट बोर्डांवर नाही. उल्लेखनीय आहे की आयसीसी (ICC) आणि आशियाई स्पर्धा वगळता दोन्ही शेजारी देश एकमेकांविरुद्ध खेळून बराच काळ लोटला आहे. दोन्ही देशांनी शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये खेळली होती. या भारतीय दौऱ्यावर पाकिस्तानी (Pakistan Tour of India) संघ तीन वनडे आणि दोन टी-20 सामने खेळला. एकदिवसीय मालिका 2-1 अशी पाकिस्तानच्या नावावर राहिली तर टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. अलीकडेच आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2021 मध्ये दोन्ही संघांमध्ये नुकताच सामना झाला होता. भारत-पाकिस्तान क्रिकेट (IND-PAK Cricket) सामना स्पर्धेतील सर्वाधिक पाहिला जाणारा ठरला होता, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. (PCB प्रमुख रमीज राजाची कबुली; भारताच्या पैशाने चालत आहे पाकिस्तान क्रिकेट, जर पंतप्रधानांनी निधी थांबवला तर आम्ही उद्ध्वस्त होऊ)
गांगुलीने शुक्रवारी 40 व्या शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात एका प्रश्नाला उत्तर देताना भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका न होण्यामागील राजनैतिक कारणे सांगितली. ते म्हणाले की, “जागतिक स्पर्धांमध्ये दोन्ही संघ एकमेकांशी खेळतात. द्विपक्षीय क्रिकेट वर्षानुवर्षे बंद आहे आणि हे असे काहीतरी आहे ज्यावर संबंधित सरकारांना काम करावे लागेल. हे रमीज किंवा माझ्या हातात नाही.” यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख रमीज राजा यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका आयोजित करणे अशक्य असल्याचे म्हटले होते. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण राजनैतिक संबंधांनी द्विपक्षीय क्रिकेट थांबवणे भाग पडले आहे. अनेक माजी क्रिकेटपटूंनी दोन्ही संघामधील द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करण्याची हमी दिली आहे, तर गांगुली यांनी ठामपणे सांगितले की केवळ बोर्ड निर्णय घेऊ शकत नाहीत.
दरम्यान, ICC टी-20 विश्वचषक 2021 च्या साखळी टप्प्याच्या सलामीच्या सामन्यात दोन्ही देशांचे संघ मात्र आमनेसामने भिडले होते जिथे पाकिस्तानने ICC स्पर्धांच्या इतिहासात प्रथमच भारताचा पराभव केला. त्यानंतर पाकिस्तानने त्यांचे सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला, जिथे त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोमहर्षक लढतीत पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत होऊन इतर तीन संघांवर विजय मिळवून भारतीय संघ सहा गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.