IND vs NZ WTC Final 2021: साउथॅम्प्टनमध्ये शेवटच्या दोन दिवसाचा खेळ शिल्लक, भारत-न्यूझीलंडला मिळू शकतो संयुक्त विजेतेपदाचा मान
केन विल्यमसन आणि विराट कोहली (Photo Credit: IANS)

IND vs NZ WTC Final 2021: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याच्या चौथ्या दिवसाचा खेळ देखील पावसामुळे रद्द करण्यात आला. साउथॅम्प्टन (Southampton) येथे पावसाच्या संतत धारेमुळे अधिकाऱ्यांना कठोर निर्णय घेण्यास भाग पाडले. मागील अनेक दिवसांपासून एजस बाउल येथील हवामानामुळे आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात अडथळा निर्माण होत आहे. 18 जून रोजी मूलतः सामन्याची सुरुवात होणार होती पण दिवसावर पावसाने पाणी फेरले. परिणामी आता 23 जून रोजी, राखीव दिवशी देखील सामना खेळला जाणार आहे. साउथॅम्प्टन येथील हवामान लक्षात घेऊन आयसीसीने यापूर्वी सहावा दिवस राखीव दिवस म्हणून घोषित केला होता. तसेच साहा दिवसांतील दोन दिवस पावसाने खराब केले तर दोन दिवशी काही षटकांच्या सामना रंगला. अशापरिस्थितीत आता फक्त अखेरच्या दोन दिवसांचा खेळ शिल्लक असून तेव्हा देखील पावसाचे वर्चस्व पाहायला मिळू शकते जेणेकरून भारत-न्यूझीलंड संघाना कसोटी अजिंक्यपदाचा संयुक्त विजेता घोषित करण्याची शक्यता वाढली आहे. (IND vs NZ WTC Final 2021: हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात पावसाची जोरदार बॅटिंग, चौथ्या दिवसाचा खेळ रद्द)

साउथॅम्प्टन येथे चार दिवसांत दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये एकही चेंडू टाकल्याशिवाय पावसाने संपूर्ण दिवस धुवून काढला. खेळाचा पहिला दिवसही अशाच हवामानामुळे रद्द करण्यात आला होता. खेळाचा राखीव दिवस आहे, जो निर्णायक सामन्यात विजेता शोधण्यात अद्याप मदत करू शकतो पण त्यासाठी हवामानाने साथ दिली पाहिजे. राखीव दिवशी देखील निकाल शक्य नसल्यास भारत आणि न्यूझीलंड यांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल. हॅम्पशायर बाउल येथे किवी संघासाठी काईल जेमीसनने पहिल्या डावात 5 विकेट घेत भारतीय संघाला पहिल्या डावात 217 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर सलामी फलंदाजांनी दम दाखवला आणि संघाला शानदार सुरुवात करून दिली. पण दिवसाखेरीस किवी संघाने 101 धावांवर दोन्ही सलामीवीर गमावले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा केन विल्यमसनचा न्यूझीलंड संघ 166 धावांनी भारताच्या पिछाडीवर होता.

ब्लॅककॅप्सचा सलामीवीर डेव्हन कॉनवे 54 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. केवळ पाच कसोटी डावातील त्याची ही अर्धशतकांची तिसरी धावसंख्या ठरली. या महिन्यात लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध पदार्पण सामन्यात 29 वर्षीय कॉनवेने 200 धावांची शानदार खेळी केली होती. आघाडीच्या कसोटी संघातील पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या विजेत्या संघाला 1.6 लाख अमेरिकी डॉलर्स आणि उपविजेत्या संघाला 800,000 डॉलर्सची रक्कम देण्यात येणार आहे.